व्हिडीओ व्हायरल होताच ४ मुले पोलिसांच्या जाळ्यात... पालकांसमोर ठोकल्या बेड्या...

Share:
Main Image
Last updated: 12-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १२ जुलै - शहरातील पंडित कॉलनी भागात जुन्या वादातून तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस यंत्रणेने अवघ्या काही तासांत ही कारवाई केली. अंबड गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या विधीसंघर्षित बालकांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांना सरकारवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

भरदिवसा कोयत्याने हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, पंडित कॉलनीतील आनंद लॉन्ड्री परिसरात गुरुवारी (दि. ९) ही घटना घडली. फिर्यादी युवक आणि त्याचे मित्र एका टपरीवर बासुंदी चहा पीत उभे होते. त्याच वेळी तिथे अचानक आलेल्या एका टोळक्याने जुन्या वादाची कुरापत काढून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दहशत निर्माण केली. एवढ्यावरच न थांबता, टोळक्यातील एकाने थेट कोयता काढून तक्रारदार व त्याच्या मित्रावर प्राणघातक वार केले आणि सर्व जण तिथून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.

व्हिडिओ व्हायरल अन् पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Advertisement

या थरारक मारहाणीचा आणि कोयता हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

युनिट ३ च्या पथकाने घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून चारही संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना त्यांच्या पालकांसमक्ष सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या पथकाने केली कारवाई

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके व युनिटचे वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, अंमलदार भगवान जाधव, राजेश महाले, कुणाल पचलोरे, महेंद्र दोंदे, गौरव धात्रक व सविका कदम यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Advertisement

Comments

No comments yet.