मनोहर शिंदे, (नाशिक) ११ जुलै - मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत रविवार, १२ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना ऑनलाइन स्वयं-नोंदणी (Self Enumeration) प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नाही, त्यांनी या शिबिरांचा लाभ घेऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मदतीने आपले अर्ज भरून घ्यावेत, असे आवाहन निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.
या विशेष शिबिरांच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी '१२४ नाशिक मध्य'च्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, '१२३ नाशिक पूर्व'चे कुंदन हिरे, '१२५ नाशिक पश्चिम'च्या शुभांगी भारदे, '१२६ देवळाली'च्या शर्मिला भोसले, तहसीलदार माधुरी आंधळे आणि अपर तहसीलदार अमोल निकम उपस्थित होते.
'बीएलओ' घरोघरी जाऊन करणार नोंदणी
पत्रकार परिषदेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपापल्या मतदारसंघातील मोहिमेची माहिती दिली. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) सध्या घरोघरी भेट देऊन नागरिकांकडून 'Self Enumeration' प्रक्रिया पूर्ण करून घेत आहेत. मतदार नोंदणी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी जिल्ह्यात व्यापक जनजागृतीही केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाइन प्रक्रिया करता येत नसलेल्या मतदारांनी १२ जुलै रोजी आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जाऊन बीएलओच्या मदतीने फॉर्म भरावा. केंद्रावर जाताना मतदारांनी आपले मतदार ओळखपत्र (EPIC) आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले.
मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेचे महत्त्वाचे वेळापत्रक:
टप्पा / कार्यक्रम कालावधी / तारीख
घरोघरी जाऊन नोंदणी अर्जांचे वितरण३० जून ते २९ जुलै २०२६
प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन५ ऑगस्ट २०२६
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६
दावे व हरकतींचा निपटारा करणे५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६
अंतिम मतदार यादीचे प्रसिद्धीकरण७ ऑक्टोबर २०२६
प्रत्येक पात्र मतदाराने सहभाग नोंदवावा!
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने, विशेषतः नवमतदारांनी या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे सामूहिक आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे.