सहाय्यक निबंधक जाळ्यात... यासाठी मागितले होते १० हजार...

Share:
Main Image
Last updated: 11-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) ११ जुलै - जिल्हा बँकेच्या निवडणुकीशी संबंधित ठरावावरील तक्रार मिटवण्यासाठी आणि आधीच्या कारवाईच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कर्जत येथील सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक (वर्ग २) मिलिंद प्रल्हादराव राऊत (वय ५०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून रंगेहात अटक केली. या धडक कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?

या प्रकरणातील तक्रारदार हे एका विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीकडून मतदानाचा अधिकार कोणाला द्यावा, याबाबतचा ठराव करून तो प्रस्ताव सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सादर करायचा होता. या संदर्भात सर्व संचालकांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, एका संचालकाने हा ठराव बेकायदेशीर असल्याची तक्रार सहाय्यक निबंधक मिलिंद राऊत यांच्याकडे केली होती.

राऊत यांनी ती तक्रार निकाली काढली. मात्र, ही तक्रार निकाली काढण्याच्या आणि प्रकरण परस्पर मिटवण्याच्या मोबदल्यात त्यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १० हजार रुपये राऊत यांनी आधीच स्वीकारले होते, तर उर्वरित १५ हजार रुपयांसाठी त्यांचा सतत तगादा सुरू होता.

१० हजारांवर तडजोड आणि सापळा

Advertisement

तक्रारदाराने या छळाला कंटाळून ९ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे रीतसर तक्रार नोंदवली. १० जुलै रोजी एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले.

शुक्रवारी (१० जुलै) कर्जत येथील कार्यालयातच राऊत यांनी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राऊत यांना रंगेहात पकडले. सध्या कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एसीबीची टीम

ही यशस्वी कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस अंमलदार संतोष शिंदे, वैभव सुपेकर, बाबासाहेब कराड आणि हारूण शेख यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती सविता तांबे करत आहेत.

लाचखोरीविरुद्ध आवाहन:

कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ९९३०९९७७०० या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबी प्रशासनाने केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.