गॅस मेकॅनिकच्या नावाखाली अमली पदार्थांची तस्करी... पंचवटीतून ५१ किलो ‘डोडा’ जप्त...

Share:
Main Image
Last updated: 10-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० जुलै - शहर पोलिसांकडून एकीकडे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम वेगाने राबवली जात असतानाच, दुसरीकडे पंचवटी परिसरातून एका मोठ्या तस्कराला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. गॅस रिपेअरिंगच्या व्यवसायाच्या आड अफूच्या बोंडाचा चुरा (डोडा) विकणाऱ्या एका राजस्थानी भामट्याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. संशयिताच्या घरातून तब्बल ५१.७३ किलो डोडा जप्त करण्यात आला असून, बाजारभावानुसार या संपूर्ण मुद्देमालाची किंमत ८ लाख ८३ हजार ४९५ रुपये आहे.

संशयित १० वर्षांपासून नाशिकमध्ये सक्रिय

सुभाष मंगळाराम बिष्णोई (वय ४२, मूळ रा. जोधपूर, राजस्थान; सध्या रा. दत्तनगर, पेठरोड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तस्कराचे नाव आहे. बिष्णोई हा गेल्या दहा वर्षांपासून पेठरोड भागातील दत्तनगर येथे वास्तव्यास होता. सर्वसामान्यांच्या नजरेत तो गॅस रिपेअरिंगचा व्यवसाय करायचा, मात्र या व्यवसायाच्या आडून त्याने अमली पदार्थांची हातविक्री सुरू केल्याचा संशय पोलिसांना आहे.

मध्यरात्री टाकण्यात आला छापा

पेठरोड भागातील एका गॅस मेकॅनिककडे अमली पदार्थांचा मोठा साठा असल्याची खात्रीशीर माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने बुधवारी (दि. ८) रात्री संशयित बिष्णोई याच्या घरावर अचानक छापा टाकला. घरझडती घेतली असता पोलिसांना तब्बल ५१.७३ किलो वजनाचा अफूच्या बोंडाचा चुरा (डोडा) सापडला. पोलिसांनी तातडीने बिष्णोई याच्या मुसक्या आवळल्या.

Advertisement

काय काय झाले जप्त?

पोलिसांच्या या कारवाईत ५१ किलो अमली पदार्थासह रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, पॅकिंगचे साहित्य आणि इतर संशयास्पद वस्तू असा एकूण ८,८३,४९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

या कारवाईमुळे नाशिक पोलिसांच्या नशामुक्ती अभियानाला मोठे यश आले असले, तरी शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची राजरोस खरेदी-विक्री होत असल्याचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. संशयित बिष्णोई याने हा एवढा मोठा साठा नाशिकमध्ये कोठून आणला? या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे? आणि तो हा माल नाशिकमध्ये कोणाकोणाला विकणार होता? या मुख्य सूत्रांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

यांनी केली कारवाई:

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, हवालदार भरत डंबाळे, बळवंत कोल्हे, पोलीस नाईक संतोष सौंदाणे, अंमलदार योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे, अर्चना भड तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सतीश शिरसाठ व त्यांच्या पथकाने केली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.