दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १० जुलै - राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही शिवसेना ठाकरे गटाला मोठे भगदाड पडणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाचे १० ते १२ नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वृत्तानंतर, ठाकरे गटाने नाशिक महानगरपालिकेत तातडीची बैठक आणि पत्रकार परिषद घेतली. यावेळी गटनेते केशव पोरजे यांनी आक्रमक भूमिका मांडत शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.
"आमच्याकडे ५ कोटींची ऑफर घेऊन एजंट पाठवले जात आहेत"
पत्रकार परिषदेत बोलताना गटनेते केशव पोरजे यांनी नगरसेवक फुटीचे वृत्त साफ फेटाळून लावले. "ठाकरे गटाचा कोणताही नगरसेवक फुटणार नाही, ही केवळ एक अफवा आहे. आमच्यात संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा हा विरोधकांचा डाव आहे. ज्यांना भविष्यात उपमहापौर बनायचे आहे, ते आमच्याकडे एजंट पाठवून नगरसेवकांना ५ कोटी रुपयांची आणि विकासकामांच्या निधीची ऑफर देत आहेत. आतापर्यंत त्यांच्या एजंटने आमच्या ५ ते ६ नगरसेवकांची भेट घेतली आहे," असा खळबळजनक आरोप पोरजे यांनी केला.
निधी अडवून नगरसेवकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न?
"आम्ही कालच मनपा आयुक्तांची भेट घेऊन आमची व्यथा मांडली. ठाकरे गटाच्या नगरसेवकांना निधी दिला जात नाही, अधिकारी आमच्या कामांकडे लक्ष देत नाहीत. नगरसेवकांना निधी न देऊन आणि मानसिकदृष्ट्या त्रास देऊन, ते कंटाळून पक्षप्रवेश करतील, अशी रणनीती आखली जात आहे. राम मंदिरावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, जे २-४ नगरसेवक घेऊन जातील, ते कायद्यानुसार अपात्र ठरतील आणि जे नगरसेवक पक्ष सोडतील त्यांना जनता रस्त्यावर तुडवेल!" असा कडक इशाराही पोरजे यांनी दिला.
१५ पैकी केवळ ५ नगरसेवकांची उपस्थिती; संभ्रम कायम!
एकीकडे गटनेते केशव पोरजे सर्व नगरसेवक सोबत असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्ष पत्रकार परिषदेत वेगळेच चित्र पाहायला मिळाले. ठाकरे गटाच्या एकूण १५ नगरसेवकांपैकी या पत्रकार परिषदेला केवळ ५ नगरसेवक उपस्थित होते. पोरजे यांच्या दाव्यानुसार, आदल्या दिवशी आयुक्तांना निवेदन देताना १३ नगरसेवक हजर होते; मात्र ऐन पत्रकार परिषदेत नगरसेवकांची घटलेली संख्या पाहता, नाशिक ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस आणि नगरसेवक फुटीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात अधिकच उधाण आले आहे.