सावत्र भाऊ-भावजयीकडून बेदम मारहाण... 'मुलाची मुंडी पिरगळून मारू' अशी धमकी...

Share:
Main Image
Last updated: 10-Jul-2026

निफाड, (प्रतिनिधी) १० जुलै - गोठ्यातील जळणाचे सरपण उचलून बाजूला ठेवल्याच्या किरकोळ कारणावरून सावत्र भाऊ आणि भावजयीने मिळून एकाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे घडली आहे. मारहाणीदरम्यान भावजयीने डोक्यात काठी मारल्याने दीर गंभीर जखमी झाला असून, संशयित दांपत्याने त्यांच्या मुलाचा गळा (मुंडी) पिरगळून जीवे ठार मारण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाय बांधण्याच्या जागेवरून झाला वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ गणपत भोई (वय ४५, रा. कोकणगाव, ता. निफाड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी नवनाथ आणि संशयित दत्तू गणपत भोई हे नातेसंबंधाने सावत्र भाऊ आहेत. कोकणगाव परिसरातील भोई मळा येथे 'बोरस्ते ॲग्रो'च्या समोर हे दोघे एकाच ठिकाणी राहतात.

Advertisement

बुधवारी (७ जुलै) सकाळी नवनाथ भोई हे घराला लागूनच असलेल्या गोठ्यामध्ये आपली गाय दावणीला बांधण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी भाऊ दत्तू भोई यांच्या पत्नीने जळणाचे सरपण (लाकडं) ठेवले होते. नवनाथ यांनी गाय बांधण्यासाठी ते सरपण उचलून थोडे बाजूला ठेवले.

लाठ्या-काठ्यांनी हल्ला अन् जीवे मारण्याची धमकी

आपल्या हद्दीतील सरपण बाजूला ठेवल्याचे पाहताच संशयित भावजय संतप्त झाली. तिने काहीही न ऐकता थेट हातात काठी घेऊन दीर नवनाथ यांच्या डोक्यात मारली, ज्यामुळे ते रक्तबंबाळ होऊन जखमी झाले. त्याच वेळी भाऊ दत्तू भोई यानेही आपल्या पत्नीचीच बाजू लावून धरत नवनाथ यांना अद्वातद्वा शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाण करत असतानाच या आक्रमक दांपत्याने नवनाथ यांच्या मुलाची मुंडी (गळा) पिरगळून त्याला जीवे ठार मारण्याची थेट धमकी दिली. या धक्कादायक प्रकारानंतर भयभीत झालेल्या नवनाथ भोई यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार उर्मिला काठे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.