नाशिक, (प्रतिनिधी) १० जुलै - बचत गटांच्या व्यवसाय वृद्धीसाठी फायनान्स कंपनीकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने सिडको परिसरातील महिलांना तब्बल चार कोटींहून अधिक रुपयांना गंडवणाऱ्या अट्टल भामट्या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मखमलाबाद गावातील गामणे मळा परिसरात सापळा रचून संशयित महिलेच्या मुसक्या आवळल्या. तिने आपल्या पती आणि मानलेल्या भावाच्या मदतीने हा कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे समोर आले असून, या कारवाईमुळे महिलांना गंडवणाऱ्या एका मोठ्या टोळीचा भांडाफोड झाला आहे.
सोन्याच्या बांगड्यांसह साडेअठरा लाख उकळले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सई राजेंद्र बोडके (वय ४५, रा. गामणे मळा, मखमलाबाद) असे अटक करण्यात आलेल्या भामट्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संगिता प्रशांत झिटे (रा. सावरकर चौक, सिडको) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
संशयित सई बोडके आणि तिच्या साथीदारांनी गेल्या वर्षी तक्रारदार झिटे यांची भेट घेऊन त्यांचा विश्वास संपादन केला. झिटे यांच्या 'ओम साई बचत गटाच्या' व्यवसाय वृद्धीसाठी चेन्नई येथील 'मायको फायनान्स कंपनी'कडून तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याची ग्वाही या भामट्यांनी दिली होती. हे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली संशयितांनी झिटे यांच्याकडून विविध कारणे सांगून १८ लाख ५३ हजार रुपये रोख आणि चार तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या उकळल्या. मात्र, वर्ष उलटूनही त्यांना कोणतेही कर्ज मिळाले नाही.
सिडको भागात ४ कोटींहून अधिक रुपयांचा गंडा
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित सई बोडके हिने तिच्या पती आणि मानलेल्या भावाच्या मदतीने सिडको भागातील अनेक महिलांना नवीन बचत गट स्थापन करण्यास भाग पाडले. त्यानंतर चेन्नईच्या कंपनीकडून मोठे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल चार कोटीहून अधिक रुपयांची रक्कम उकळली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलांनी पोलिसांत धाव घेतली होती. या त्रिकुटाने आणखी किती महिलांना फसवले आहे, याबाबत पोलीस आता सखोल तपास करत आहेत.
'या' पथकाने केली कामगिरी
गुन्ह्याची गांभीर्य ओळखून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, अंमलदार चारूदत्त निकम, भगवान जाधव आणि महिला अंमलदार सविता कदम आदींच्या पथकाने मखमलाबाद परिसरातून संशयित महिला सई बोडके हिला शिताफीने अटक केली.