नाशिक, (प्रतिनिधी) १० जुलै - व्यवसाय वाढवण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेकडून लाखोंचे कर्ज मंजूर करून देतो असे आमिष दाखवून एका परिचित व्यवसायिकाला ५ लाख रुपयांना गंडवणाऱ्या अट्टल भामट्याला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने दिंडोरी तालुक्यातील जऊळके येथून अटक केली आहे. शांताराम मार्तंड संधान-पाटील (वय ४७, रा. भोईरमळा, मखमलाबाद, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बँकेच्या 'प्रोसेसिंग फी'च्या बहाण्याने उकळले पैसे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिक आणि संशयित शांताराम संधान-पाटील हे एकमेकांचे परिचित आहेत. काही महिन्यांपूर्वी तक्रारदाराने संशयितासोबत आपल्या व्यवसायाच्या वाढीबाबत चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान संशयिताने व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला आणि एका राष्ट्रीय बँकेकडून विनामोबदला मोठे कर्ज मंजूर करून देण्याची ग्वाही दिली. त्यासाठी बँकेची 'प्रोसेसिंग फी' आणि इतर कागदपत्रांचा खर्च म्हणून संशयिताने व्यावसायिकाकडून ५ लाख रुपये रोख स्वीकारले.
कर्जही नाही आणि पैसेही नाही; व्यावसायिकाची चाळीसगाव पोलिसात धाव
पैसे आणि कागदपत्रे देऊन काही महिने उलटल्यानंतरही व्यावसायिकाला बँकेकडून कोणतेही कर्ज मिळाले नाही. तसेच प्रोसेसिंग फी म्हणून दिलेले ५ लाख रुपयेही संशयिताने परत केले नाहीत. व्यावसायिकाने वेळोवेळी पैशांसाठी तगादा लावला असता संशयिताने टोलवाटोलवी सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलीस ठाणे गाठून रीतसर फिर्याद दिली. चाळीसगाव पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती नाशिक शहर पोलिसांना दिल्यानंतर नाशिकची पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती.
दिंडोरी तालुक्यातून आवळल्या मुसक्या
संशयिताचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट २ चे अंमलदार मनोहर शिंदे व चंद्रकांत गवळी यांना संशयित शांताराम हा दिंडोरी तालुक्यातील जऊळके येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ सापळा रचून संशयिताच्या मुसक्या आवळल्या. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला चाळीसगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
'या' पथकाने केली कामगिरी
ही कारवाई नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक डॉ. समाधान हिरे, उपनिरीक्षक संजय सानप, जमादार मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, हवालदार चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, अंमलदार प्रवीण वानखेडे, तेजस मते आणि जितेंद्र वजीरे आदींच्या पथकाने केली.