नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ९ जुलै - वाढत्या महागाईच्या काळात भारतीय वाहनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लवकरच मोठी कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगातील सर्वात मोठी तेल निर्यातदार कंपनी 'सौदी अरामको'ने (Saudi Aramco) भारतासह संपूर्ण आशियाई ग्राहकांसाठी आपल्या कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत ऐतिहासिक कपात केली आहे.
२००३ नंतरची सर्वात मोठी आणि विक्रमी कपात
'सौदी अरामको'ने आगामी ऑगस्ट महिन्यासाठी इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात कमी केले आहेत. कंपनीने आपले आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वाधिक विकले जाणारे कच्चे तेल 'अरेब लाईट'ची (Arab Light) किंमत प्रादेशिक ओमान/दुबई मानकापेक्षा प्रति बॅरल १.५० डॉलरने कमी ठेवली आहे. चालू जुलै महिन्याच्या तुलनेत ही प्रति बॅरल तब्बल ११ डॉलरची मोठी कपात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, वर्ष २००३ नंतरची म्हणजेच गेल्या २३ वर्षांतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी दरांती मानली जात आहे.
या विक्रमी कपातीमुळे ओएसपी (Official Selling Price) जून २०२० नंतरच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. यापूर्वी कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये जेव्हा जागतिक स्तरावर कच्च्या तेलाची मागणी पूर्णपणे ठप्प झाली होती, नेमकी तशीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे.
भारताला कसा आणि किती होणार फायदा?
भारत हा जगातील प्रमुख तेल आयातदार देश असून, आपल्या गरजेच्या ८० टक्क्यांहून अधिक कच्चे तेल परदेशातून आयात करतो. सौदी अरेबियाने दरात कपात केल्यामुळे भारताचा तेल आयात खर्च (Import Bill) कमालीचा घटणार आहे.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांच्या (OMCs) गणितीय सूत्रानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल १० डॉलरची वाढ झाल्यास भारतीय तेल कंपन्यांना प्रति लीटर अंदाजे ६ रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. आता नेमकी याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. सौदीने प्रति बॅरल ११ डॉलर दर कमी केल्यामुळे भारतीय कंपन्यांचा तोटा भरून निघून त्यांचा नफा वाढणार आहे. परिणामी, हा थेट फायदा सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपन्या भारतात पेट्रोल-डिझेलचे दर प्रति लीटर काही रुपयांनी स्वस्त करू शकतात.