वाहन चालकाला दगडधोंड्यांनी बेदम मारहाण... 'पुन्हा भेटला तर पाय तोडू'... विंचूर येथील गंभीर प्रकार...

Share:
Main Image
Last updated: 09-Jul-2026

लासलगाव, (प्रतिनिधी) ९ जुलै - वाहनाला पाठीमागून धडक दिल्याचा जाब विचारणे एका वाहनचालकाला चांगलेच महागात पडले आहे. संतप्त झालेल्या तीन जणांच्या टोळक्याने चालकाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर 'पुन्हा भेटला तर पाय तोडू' अशी धमकी देत संशयितांनी दगड फेकून मारल्याने चालक जखमी झाला असून, झटापटीत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेटही तुटले आहे. ही घटना निफाड तालुक्यातील विंचूर येथील हॉटेल किसानसमोर घडली.

पाठीमागून आलेल्या वाहनाने दिली धडक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल निवृत्ती खापरे (वय ४४, रा. विंचूर, ता. निफाड) यांनी याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खापरे हे मंगळवारी (७ जुलै) आपले वाहन घेऊन येवलाच्या दिशेने जात होते. ते विंचूर जवळील हॉटेल किसानसमोर आले असता, पाठीमागून भरधाव आलेल्या एका वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

Advertisement

'पुन्हा भेटला तर पाय तोडू' अशी दिली धमकी

अपघात झाल्यानंतर खापरे हे नुकसानीचा जाब विचारण्यासाठी आपल्या वाहनातून खाली उतरले. मात्र, समोरच्या वाहनातील तिघांनी चूक मान्य करण्याऐवजी उलट खापरे यांनाच गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 'पुन्हा भेटला तर तंगडे (पाय) तोडू' अशी धमकी देत तिघांनी खापरे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

दगडफेकीत चालक जखमी

या मारहाणीदरम्यान झालेल्या झटापटीत खापरे यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट तुटून नुकसान झाले. तसेच संशयितांनी त्यांच्यावर दगड फेकून मारल्याने ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी किरण मधुकर उफाडे (रा. वरखेडा, ता. चांदवड) आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.