कारची दुचाकीला भीषण धडक... १८ वर्षीय तरुण ठार... आईसह गर्भवती बहीण गंभीर जखमी...

Share:
Main Image
Last updated: 09-Jul-2026

ओझर, (प्रतिनिधी) ९ जुलै - दिक्षी ते ओझर मार्गावरील ठुबे वस्ती परिसरात एका भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत १८ वर्षीय दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. तर दुचाकीवर मागे बसलेल्या त्याची आई आणि गर्भवती बहीण गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहीण आणि आईला घेऊन निघाला होता तरुण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर संतोष पवार (वय १८, रा. सय्यद पिंप्री, ता. जि. नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. रविवारी (५ जुलै) सकाळी शंकर हा आपल्या (एमएच १५ जेटी ४६१२) या दुचाकीवरून आई सुरेखा पवार आणि गर्भवती बहीण वनिता गोफणे यांना सोबत घेऊन ट्रिपल सीट प्रवास करत होता.

Advertisement

भरधाव कारने दिली धडक

दिक्षी ते ओझर दरम्यान असलेल्या ठुबे वस्ती भागात आले असता, समोरून येणाऱ्या एका भरधाव (एमएच १५ डीएम ५८४९) कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दुचाकी चालक शंकर पवार याचा मृत्यू झाला. तर त्याच्या मागे बसलेल्या आई सुरेखा पवार आणि गर्भवती बहीण वनिता गोफणे या दोघी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारचालकावर गुन्हा दाखल

अपघातानंतर जखमी आई सुरेखा पवार यांनी रुग्णालयातून दिलेल्या जबाबावरून ओझर पोलीस ठाण्यात कारचालक अनिल नामदेव भंडारे (रा. कसबे सुकेणे, ता. निफाड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ओझर पोलीस ठाण्याचे हवालदार वारे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.