पुण्यात भीषण दुर्घटना... कचऱ्याचा डोंगर कोसळून इमारत पत्त्यासारखी ढासळली... ५ ठार, १० अडकले...

Share:
Main Image
Last updated: 08-Jul-2026

पुणे, (प्रतिनिधी) ८ जुलै - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोशी येथील 'वेस्ट टू एनर्जी' (कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पात बुधवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा एक प्रचंड मोठा ढिगारा घसरून थेट प्रकल्पाच्या मुख्य इमारतीवर कोसळला. या जबर धडकेमुळे इमारतीचा मोठा भाग क्षणार्धात पत्त्यासारखा कोसळला. या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, अद्यापही ८ ते १० कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुसळधार पाऊस ठरला कारणीभूत

प्रकल्प परिसरात कचऱ्याचे प्रचंड उंच ढिगारे साचलेले आहेत. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या ढिगाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी मुरले होते. पाण्याचा अंश वाढल्याने कचऱ्याचे वजन कमालीचे वाढले आणि दुपारच्या सुमारास कचऱ्याचा हा डोंगर अचानक खचला. हा ढिगारा थेट प्रकल्पाच्या मुख्य इमारतीवर आदळल्याने इमारत कोसळली आणि आत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

 युद्धपातळीवर बचावकार्य; पावसामुळे अडथळे

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि पोकलेनसह इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, कचऱ्याचा ढिगारा प्रचंड मोठा असल्याने आणि वरून सतत पाऊस सुरू असल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. दुर्गंधी आणि चिखलाचे साम्राज्य असूनही बचाव पथकांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

Advertisement

 पोलिसांची धावपळ; आषाढी वारी बंदोबस्ताचा ताण

सध्या आषाढी वारी सोहळा सुरू असल्याने पोलीस दलातील मोठा फौजफाटा आधीच पालखी मार्गावर आणि इतर बंदोबस्तासाठी तैनात आहे. अशा परिस्थितीत ही अचानक मोठी दुर्घटना घडल्याने उपलब्ध पोलीस यंत्रणेची सुरुवातीला मोठी धावपळ उडाली. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासह मदतकार्याला गती दिली जात आहे.

?s=20

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

दुर्घटनेचे नेमके कारण, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांची निश्चित संख्या आणि मृतांचा अधिकृत आकडा याबाबत प्रशासनाकडून अजूनही माहिती संकलित केली जात आहे. संपूर्ण ढिगारा उपसल्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. या भीषण दुर्घटनेमुळे मोशी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.