मुसळधार पावसाने नाशिकचे जनजीवन विस्कळीत... गोदावरीला पूर... अनेक रस्ते बंद, युद्धपातळीवर मदतकार्य सुरू....

Share:
Main Image
Last updated: 08-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) ८ जुलै - नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागांत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून ऐतिहासिक 'दुतोंड्या मारुती'ची मूर्ती अर्धी पाण्यात बुडाली आहे. सातपूर, त्र्यंबकेश्वर, कळवण आणि इगतपुरी भागात रस्ते खचल्याने, दरडी कोसळल्याने आणि पुलांवर पाणी आल्याने अनेक प्रमुख वाहतूक मार्ग बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, दुपारी १२ वाजेनंतर पावसाने काहीशी उघडीप दिल्यामुळे प्रशासनाला मदतकार्यास गती देता आली आहे. माहिती मिळताच विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने गोदावरी नदीकाठच्या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

धरणांमधून मोठा विसर्ग: नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नांदूर मधमेश्वर बंधारा: गोदावरी नदीपात्रात आज दुपारी १२ वाजेपासून १५,२४८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. पूर नियंत्रण कक्षाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी नदीकाठच्या नागरिकांना आपले जनावरे आणि साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन केले आहे.

पालखेड धरण (दिंडोरी): धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सकाळी ९.०० वाजता ६२० क्युसेक्सने सुरू केलेला विसर्ग सकाळी १०.०० वाजता वाढवून २,०५४ क्युसेक्स करण्यात आला असून हे पाणी कादवा नदीत सोडण्यात येत आहे.

वाहतूक ठप्प; प्रमुख रस्ते आणि पूल बंद

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे मार्ग आणि पूल सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत:

नाशिक शहर: नासर्डी पूल आणि सातपूर ते मौले मळा रस्ता (नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे) वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पोलीस व महापालिकेने येथे बॅरिकेड्स लावले आहेत. जलालपूर-गोवर्धन पूलही बंद आहे.

नाशिक–गुजरात महामार्ग (पेठ रोड): पेठ रोडचा एक भाग पाण्याखाली गेल्याने गुजरातकडे जाणारी वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

सातपूर-त्र्यंबक मार्ग: पिंपळगाव बहुला येथील नाल्यावरील मोरीचे पाईप पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याने तिथे २० फूट खोल खड्डा पडला आहे. त्यामुळे हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला असून समृद्धीनगरपर्यंत २ किमीच्या रांगा लागल्या आहेत.

सातपूर कार्बन नाका कोंडी: कार्बन नाक्याजवळ सकाळी ९ वाजता एक मालवाहू ट्रक ६ फूट खोल खड्ड्यात अडकल्याने २ किलोमीटरपर्यंत कोंडी झाली होती. मनपा आणि पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरू केले.

Advertisement

कळवण तालुका: गिरणा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने कळवण-बिलबारे-कनाशी रस्ता (रामा २२) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

 त्र्यंबकेश्वर, इगतपुरीत दरडी कोसळल्या

गणपत बारी: त्र्यंबक-पालघर रस्त्यावरील गणपत बारी येथे दरड कोसळल्याने रस्त्याचा अर्धा भाग बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळा करत आहे.

बेझे वॉटर ग्रीड: नील पर्वताच्या पायथ्याशी पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्याशेजारी लँडस्लाईड (दरड कोसळणे) झाल्याने एका वस्तीवरील १० ते १२ कुटुंबांचा त्र्यंबककडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. प्रांत अधिकारी आणि तहसीलदार घटनास्थळी उपस्थित असून रस्ता पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

भावली खुर्द: मौजे भावली खुर्द येथील धामणकेवाडी रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

बेळगाव ढगा शिवार: त्र्यंबकेश्वर रोडवर पुरामुळे रस्त्याचा एका बाजूचा भाग खचला असून, दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरळीत केली जात आहे.

कुंभमेळ्याचे तात्पुरते कार्यालय वाहून गेले!

त्र्यंबकेश्वरमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी रस्ते खोदलेले असल्यामुळे डोंगरावरून आलेल्या मातीमुळे शहरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरम्यान, नाशिकच्या तपोवन परिसरात कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी महापालिकेने उभारलेले शेडचे तात्पुरते ऑफिस गोदावरीच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुढील ३ तासांचा इशारा:

हवामान मंत्रालयाने (मुंबई) दिलेल्या सूचनेनुसार, पुढील ३ तासांत नाशिक, पुणे (घाट माथा), धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत काही ठिकाणी ताशी ४०-५० किमी वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची दाट शक्यता वर्तवली आहे. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.