गुजरात ते संभाजीनगर व्हाया पेठ... पेठ सीमा बनली तस्करांचा मार्ग... 'एफडीए'ची मोठी कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 07-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) ७ जुलै - गुजरात राज्यातून पेठमार्गे महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे होणारी गुटखा तस्करी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) भरारी पथकाने यशस्वीरित्या उघडकीस आणली आहे. बोरवड फाटा परिसरात केलेल्या धडक कारवाईत पथकाने एका वाहनातून सुगंधी तंबाखू आणि पानमसाला असा एकूण ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन तस्करांना अटक करण्यात आली असून पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल कडुबा मोरे आणि अरबाज युसूफ शेख (दोघे रा. वाकळा, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित गुटखा तस्करांची नावे आहेत. या संदर्भात अन्न सुरक्षा अधिकारी चेतन परदेशी यांनी पेठ पोलिसांत फिर्याद दिली आहे.

बोरवड फाट्यावर 'एफडीए'चा सापळा

गुजरातच्या वापी भागातून पेठमार्गे बंदी असलेल्या गुटख्याची मोठी खेप महाराष्ट्रात आणली जात असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने शनिवारी (दि. ४) पेठ जवळील बोरवड फाटा येथे तातडीने धाव घेत नाकाबंदी केली आणि वाहनांची तपासणी सुरू केली.

Advertisement

विमल गुटख्याची पोती जप्त

नाकाबंदी दरम्यान वापी कडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव जाणारे 'एमएच २० जीझेड २७२९' क्रमांकाचे वाहन पथकाने संशयावरून अडवले. या वाहनाची कसून झडती घेतली असता, त्यात गुपचूप लपवून ठेवलेली विमल गुटखा आणि सुगंधी तंबाखूची पोती आढळून आली. पथकाने तात्काळ कारवाई करत वाहनातील दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आणि वाहनासह सर्व मुद्देमाल जप्त केला.

पेठ सीमा बनली तस्करांचा मार्ग?

गुजरात राज्यातून नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या गुटख्याच्या राजरोस तस्करीमुळे सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या कारवाईनंतर पेठ पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक दरगुडे या तस्करीच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.