एस.के. खेडकर, (नाशिक) ७ जुलै - महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेच्या (आयटक) सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि राज्यव्यापी आंदोलनाला मोठे यश आले आहे. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांवर निवडणूक कामाची कोणतीही सक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी एका अधिकृत पत्राद्वारे दिले आहेत.
आयटक संलग्न संघटनेच्या वतीने आशा व गटप्रवर्तकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात राज्यभर निवेदने देऊन आंदोलने करण्यात आली होती. आशा सेविकांवर 'एसआयआर' (SIR) तसेच 'बीएलओ' (BLO) च्या कामांची सक्ती केली जात असल्याने ग्रामीण व शहरी भागातील अत्यावश्यक आरोग्य सेवा विस्कळीत होत असल्याकडे संघटनेने आयुक्तांचे लक्ष वेधले होते. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी हा दिलासादायक निर्णय घेतला आहे.
आयुक्तांच्या पत्रातील महत्त्वाचे आदेश:
सक्ती पूर्णपणे बंद: आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना निवडणूक कामाची (SIR व BLO) सक्ती करण्यात येऊ नये.
पर्यायी व्यवस्था करा: निवडणूक कामांसाठी आशा सेविकांऐवजी इतर पर्यायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.
योग्य मोबदला बंधनकारक: अगदीच अत्यावश्यक परिस्थितीत जर आशा गटप्रवर्तकांची सेवा घ्यावी लागली, तर त्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन त्यांना नियमानुसार योग्य मोबदला देण्यात यावा.
हजारो आशा सेविकांना दिलासा
या निर्णयामुळे राज्यातील हजारो आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना निवडणूक कामाच्या जाचातून मोठा दिलासा मिळाला आहे. आता त्यांना त्यांच्या मूळ असलेल्या आरोग्य सेवेच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येणार आहे.
माध्यमांचे आभार
"आशा गटप्रवर्तकांच्या या गंभीर प्रश्नाला राज्यभर वाचा फोडण्यात वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सातत्यपूर्ण बातम्यांमुळेच हा प्रश्न निकाली निघू शकला, म्हणूनच आम्ही सर्व माध्यमांचे विशेष आभार मानतो."
— कॉम्रेड राजू देसले (राज्य अध्यक्ष), कॉम्रेड वैशाली खंदारे (कार्याध्यक्ष), कॉम्रेड मंदा डोंगरे (सरचिटणीस), महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना (AITUC).