जादूटोण्याची भीती दाखवून आधी बलात्कार, नंतर बळजबरीने विवाह... भोंदूबाबा गजाआड...

Share:
Main Image
Last updated: 07-Jul-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) ७ जुलै - धंद्यात बरकत आणण्याचे आमिष दाखवून पंचवटीतील एका महिलेला जादूटोण्याची भीती घालत तिच्यावर बलात्कार करणे, त्यानंतर जिवाच्या भीतीने बळजबरीने लग्न करून दोन-तीन वर्षे अमानुष छळ करणाऱ्या दारणा सांगवी येथील भोंदूबाबा यौवन भानुदास गोहाड याच्या मुसक्या आवळण्यात सायखेडा पोलिसांना यश आले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) प्रभावी पाठपुराव्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने ही धडक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात गाजलेल्या भोंदू अशोक खरात याच्यानंतर दाखल झालेला हा आठवा गुन्हा आहे.

धंद्यात बरकतीच्या बहाण्याने फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पंचवटी परिसरातील पीडित महिला स्वतःचे चहाचे दुकान चालवून उदरनिर्वाह करत होती. व्यवसाय म्हणावा तसा चालत नसल्याने काही ओळखीच्या व्यक्तींनी तिला सायखेडा जवळील दारणा सांगवी येथील भोंदूबाबा यौवन भानुदास गोहाड याच्याकडे नेले. भोंदू गोहाड याने व्यवसायाची भरभराट होईल, असे खोटे सांगून महिलेला मंतरलेले तांदूळ, कडक उद जाळून त्याची दुकानात धुनी देण्यास सांगितले. तसेच मंतरलेल्या पाचोळ्याची आणि जडीबुटीची पुडी दुकानात ठेवण्यास सांगून तिच्याकडून ३ हजार रुपये उकळले व तिची फसवणूक केली.

भीती दाखवून अत्याचार व सक्तीने लग्न

काही दिवसांनंतर भोंदू गोहाड याने पीडितेवर वाईट नजर ठेवली. ‘माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाही, तर जादूटोणा करून तुला मारून टाकेल’, अशी भीती त्याने पीडितेला घातली. या भीतीपोटी त्याने पीडितेवर अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता, स्वतःचे पहिले लग्न झालेले असतानाही, पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी बळजबरीने विवाह केला.

Advertisement

पीडितेसह पोटच्या पोराचा गळा दाबण्याचा प्रयत्न

लग्नानंतर भोंदू गोहाड घरातच भोंदूगिरीचे प्रकार करत असल्याने पीडित महिलेने त्याला कडाडून विरोध केला. याचा राग आल्याने भोंदूने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गेल्या दोन-तीन वर्षांपासून तिचा अमानुष छळ सुरू केला. हा छळ असह्य झालेला असतानाच, तीन-चार दिवसांपूर्वी भोंदू गोहाड याने पीडित महिला आणि स्वतःच्या अवघ्या एक वर्षाच्या निष्पाप मुलाचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या जीवघेण्या प्रसंगातून पीडितेने स्वतःची कशीबशी सुटका केली आणि नातेवाइकांच्या मदतीने ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर बेड्या

‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी पीडितेची आपबिती ऐकून तातडीने नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डी. एस. स्वामी यांचे कार्यालय गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक स्वामी यांनी सायखेडा पोलीस ठाण्याला सखोल तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सायखेडा पोलिसांत जादूटोणाविरोधी कायद्यासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी भोंदूबाबा यौवन गोहाड याला तात्काळ अटक केली आहे.

इतर पीडितांनी पुढे यावे: 'अंनिस'चे आवाहन

भोंदू यौवन गोहाड याने मंत्रतंत्र आणि जादूटोण्याच्या बहाण्याने आजवर अनेक कुटुंबांना फसवून त्यांचे आर्थिक व शारीरिक शोषण केले असण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारे फसवणूक झालेल्या इतर पीडित व्यक्तींनी आणि महिलांनी न घाबरता धाडसाने पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन ‘अंनिस’चे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, प्रल्हाद मिस्त्री आणि कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.