पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरली... कपाटातून सोन्याची पोतच लंपास केली...

Share:
Main Image
Last updated: 07-Jul-2026

निफाड, (प्रतिनिधी) ७ जुलै - शेतकामासाठी आलेल्या एका मजूर महिलेने मालकाच्या विश्वासाला तडा देत घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे घडली आहे. पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या या भामट्या महिलेने कपाटातून सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली. याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगिता भागवत खालकर (रा. धोंडाईमळा, भेंडाळी, ता. निफाड) यांनी या संदर्भात सायखेडा पोलिसांत फिर्याद दिली आहे. खालकर कुटुंबिय धोंडाईमळा भागातील आपल्या शेतात वास्तव्यास आहे.

Advertisement

पाणी पिण्याचा बहाणा बेतला अंगाशी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मंगळवारी (दि. ३०) खालकर यांच्या शेतात कामासाठी काही मजूर महिला आल्या होत्या. दुपारच्या सुमारास शेतात काम सुरू असताना, औरंगपूर येथील एका मजूर महिलेने आपल्याला तहान लागल्याचे सांगितले. पिण्याचे पाणी आणण्याच्या बहाण्याने ती शेतातील खालकर यांच्या घरात गेली.

कपाट उघडून दागिने लंपास

घरात कोणीही नसल्याची संधी साधून या मजूर महिलेने थेट घरातील लाकडी कपाट उघडले. कपाटात ठेवलेली दीड तोळे वजनाची आणि सुमारे ५९ हजार ८०० रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून तिने गुपचूप पोबारा केला. हा प्रकार नंतर लक्षात आल्यानंतर खालकर यांनी पोलिसांत धाव घेतली.

मजुराची कृतघ्नता!
शेतात कष्टाचे काम देणाऱ्या मालकाच्याच घरात चोरी केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. फिर्यादीवरून औरंगपूर येथील संशयित मजूर महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायखेडा पोलीस ठाण्याचे हवालदार आहिरे या चोरीचा पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.