मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ‘निमा’चा मोठा निर्णय... उद्योजकांना पाठवले हे पत्र...

Share:
Main Image
Last updated: 06-Jul-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) ६ जुलै - नाशिक आणि परिसरात हवामान विभागाने वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने (NIMA - निमा) जिल्ह्यातील सर्व उद्योजक आणि मानवी संसाधन (HR) प्रमुखांसाठी एक महत्त्वाची नियमावली (Advisory) जारी केली आहे. "कोणतेही उत्पादनाचे उद्दिष्ट हे मानवी आयुष्यापेक्षा मोठे असू शकत नाही, सुरक्षितता हीच सर्वात पहिली प्राथमिकता असली पाहिजे," असे स्पष्ट करत ‘निमा’ने सर्व उद्योगांना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोके टाळण्यासाठी आणि कारखान्यांमधील सुरक्षितता राखण्यासाठी 'निमा'च्या वतीने खालील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत:

कारखाने आणि उद्योगांसाठी ‘निमा’च्या मार्गदर्शक सूचना:

अत्यावश्यक नसलेले काम पुढे ढकला: कारखान्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन, आवश्यकतेनुसार गैर-अत्यावश्यक उपक्रम किंवा कामे तूर्तास पुढे ढकलण्यात यावीत.

Advertisement

परिसराची तपासणी करा: कंपनी किंवा कारखाना परिसरामध्ये पाणी साचणे (Waterlogging), पाण्याचा निचरा होणारी यंत्रणा आणि संभाव्य विजेचे धोके (Electrical Hazards) यांची तातडीने तपासणी करून घ्यावी.

बाहेरची कामे टाळा: अतिवृष्टीच्या काळात जास्त जोखमीची बाहेरील (Outdoor) कामे पूर्णपणे टाळावीत. तसेच कारखान्यातील यंत्रसामग्री, कच्चा माल आणि महत्त्वाचे दस्तऐवज (Records) सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.

आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा: सर्व कंपन्यांनी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, प्रथमोपचार (First-aid) किट आणि बॅकअप पॉवर (जनरेटर) पूर्णपणे सज्ज ठेवावेत.

कामाच्या वेळांबाबत लवचिकता: परिस्थिती अधिक धोकादायक झाल्यास, वेळेवर योग्य निर्णय घेऊन कामकाज तात्पुरते स्थगित करावे किंवा कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे घरी जाण्याची परवानगी द्यावी.

तसेच, सर्व कर्मचाऱ्यांनी प्रवास करताना पूरग्रस्त रस्ते किंवा धोकादायक भागातून जाणे टाळावे आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असेही ‘निमा’च्या वतीने सांगण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.