चांदवड, (प्रतिनिधी) ६ जुलै - मैत्रीणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून दोन जणांनी एका १९ वर्षीय तरुणाला विहिरीत फेकून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे उघडकीस आला आहे. सुरुवातीला पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे वाटत असलेल्या या घटनेला आता हत्येचे वळण मिळाले असून, चांदवड पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रोशन तुकाराम वाघचौरे (२७) आणि सचिन दत्तात्रेय गाडे (२३, दोघे रा. तळेगाव रोही, ता. चांदवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. मृत तरुणाचे वडील अशोक शिवाजी वाघचौरे (४९, रा. लासलगाव रोड, तळेगाव रोही) यांनी या संदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे.
डिझेल संपल्याचा बहाणा करून बोलावले
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार २१ मे रोजी घडला होता. संशयित रोशन वाघचौरे याच्या मैत्रीणीशी मृत शरद अशोक वाघचौरे (१९) याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. याच कारणावरून त्यांच्यात आधी वादही झाला होता. या वादाचा राग मनात धरून, संशयितांनी २१ मे रोजी ट्रॅक्टरचे डिझेल संपल्याचा बहाणा केला. त्यांनी शरदला लक्ष्मण पानसरे यांच्या शेतात डिझेल घेऊन येण्यास सांगितले.
विहिरीत फेकून केला घातपात
शरद डिझेल घेऊन पोहोचला असता, दोन्ही संशयितांनी पूर्ववैमनस्यातून संगनमत केले आणि शरदला उचलून जबरदस्तीने विहिरीत फेकून दिले. त्यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर तळेगाव रोही शिवारातील अमोल आनंदा पानसरे यांच्या शेत गट नं. ६१८ मधील विहिरीत शरदचा मृतदेह आढळून आला होता.
वडिलांच्या पाठपुराव्यामुळे हत्येला वाचा
सुरुवातीला शवविच्छेदन अहवालात शरदचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाल्याचे समोर आले होते. मात्र, मुलाचा मृत्यू अपघाती नसून घातपात असल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला होता. वडिलांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे आणि पोलिसांच्या चौकशीमुळे अखेर या हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे. या खळबळजनक घटनेमुळे तळेगाव रोही परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.