स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनसेवा सप्ताह.... जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांची घोषणा

Share:
Main Image
Last updated: 06-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ६ जुलै - महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत ‘जनसेवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात जिल्हाभर समाजोपयोगी, लोकहितकारी आणि जनकल्याणाच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, स्व. अजितदादा पवार यांच्या जनसेवेच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्यात येणार आहे.

दरवर्षी २२ जुलै हा दिवस स्व. अजितदादा पवार यांचा वाढदिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर हा दिवस केवळ स्मरणाचा न राहता समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संकल्प दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे यंदा वाढदिवस साजरा करण्याऐवजी संपूर्ण आठवडा ‘जनसेवा सप्ताह’ म्हणून साजरा करून समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

स्व. अजितदादा पवार हे अथक परिश्रम, दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व, दूरदृष्टी, निर्णयक्षमता आणि जनतेसाठी अखंड झटणारे लोकनेते म्हणून ओळखले जात होते. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांप्रती त्यांची संवेदनशीलता कायम राहिली. कृषी, सहकार, अर्थव्यवस्था, उद्योग, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवला आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयुष्यभर कार्य केले.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘रयतेचे राज्य’ या संकल्पनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या समतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा सातत्याने पुरस्कार केला. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत विकासाभिमुख, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक राजकारणाची दिशा त्यांनी राज्याला दिली.

Advertisement

मा.ना. मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सूचनेनुसार, स्व. अजितदादा पवार यांच्या याच विचारांचा आणि जनसेवेच्या संस्कारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जनसेवा सप्ताहात जिल्हाभर विविध विधायक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

जनसेवा सप्ताहांतर्गत आयोजित करण्यात येणारे प्रमुख उपक्रम :

- पर्यावरण संवर्धन विषयक अभियान
- आरोग्य विषयक उपक्रम 
- सामाजिक सेवा उपक्रम
- महिला सक्षमीकरण विषयक कार्यक्रम
- शेतकरी व कृषीविषयक जनजागृती उपक्रम
- युवकांसाठी युवा संकल्प शिबिरे
- विद्यार्थी मार्गदर्शन व शैक्षणिक उपक्रम
- अल्पसंख्याक समाजासाठी सेवा व जनजागृती कार्यक्रम
- लोककल्याणकारी उपक्रम

या जनसेवा सप्ताहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व , लोकप्रतिनिधी, महिला, युवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सेलचे पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्व. अजितदादा पवार यांच्या जनसेवेच्या विचारांना कृतीतून अभिवादन करावे, असे आवाहन नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप आण्णा खैरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

समाजसेवा हीच स्व. अजितदादा पवार यांना खरी आदरांजली असल्याची भावना व्यक्त करत, त्यांचे अपूर्ण राहिलेले लोककल्याणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने समाजाशी नाळ जोडून सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प या जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.