एस.के. खेडकर, (नाशिक) ५ जुलै - नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव आणि अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेतंर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने चांदवड-लासलगाव रोडवरील दिघवद शिवारात सापळा रचून एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून तब्बल ३२ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सिन्नर परिसरातील ३ संशयित तस्करांना अटक करण्यात आली असून, कार, मोबाईल आणि रोख रक्कमेसह एकूण १४ लाख ७४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून रचला सापळा
४ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चांदवड परिसरात गस्त घालत होते. याच दरम्यान पोलीस निरीक्षकांना त्यांच्या खात्रीशीर गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चांदवडकडून लासलगावच्या दिशेने जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून काही संशयित इसम गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करत आहेत. माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने हालचाली करत दिघवद शिवारात सापळा रचला आणि संशयित स्विफ्ट डिझायर कारवर (क्र. MH-01-BT-8813) छापा टाकला.
सिन्नरचे ३ संशयित ताब्यात
कारची तपासणी केली असता, पोलिसांनी कारमधील तीन संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) संदिप रामनाथ सानप (वय ३६, रा. कानडी मळा, सिन्नर, जि. नाशिक)
२) अनिल केशव बोडके (वय ३०, रा. मापारवाडी, सिन्नर, जि. नाशिक)
३) यश संदिप मोरे (वय २४, रा. कानडी मळा, सिन्नर, जि. नाशिक)
डिक्कीत सापडला ३२ किलो गांजा
पोलिसांनी पंचांसमक्ष गाडीची कसून झडती घेतली असता, कारच्या डिक्कीमध्ये तब्बल ३२ किलो वजनाचा गांजा लपवून ठेवल्याचे आढळून आले. मानवी मनावर विपरित परिणाम करणारा हा अंमली पदार्थ कोणत्याही परवान्याशिवाय, बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी गांजा, तस्करीसाठी वापरलेली स्विफ्ट कार, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १४,७४,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चांदवड पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) कलम ८(क), २०(ब)(आयआय)(क), २९ प्रमाणे गुन्हा (गु.र.नं. २७६/२०२६) दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चांदवड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार करत आहेत.
तस्करीविरुद्ध कारवाईची मोहीम तीव्र राहणार!
नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक, तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी यापुढेही अशाच प्रकारे अत्यंत कडक आणि प्रभावी कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.