नाशिक, (प्रतिनिधी) ५ जुलै - आपल्या वादग्रस्त कारभारामुळे नेहमीच चर्चेत राहणारे देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड पुन्हा एकदा एका मोठ्या घोटाळ्यामुळे हादरले आहे. बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अजय कुमार यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा तब्बल ५.७२ कोटी रुपयांची अधिक बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डासह नाशिकच्या प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आई आणि पत्नीही सहसंशयित!
सीबीआयने केवळ माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्यावरच नाही, तर या बेकायदेशीर उत्पन्नात त्यांना प्रत्यक्ष साथ देणाऱ्या आणि गुन्ह्यास प्रवृत्त करणाऱ्या त्यांच्या कौटुंबिक सदस्यांनाही आरोपी केले आहे. काळा पैसा आणि संपत्ती लपवण्यासाठी अथवा हस्तांतरित करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी अजय कुमार यांच्या पत्नी स्मिता कुमारी आणि आई निर्मला देवी यांनाही सीबीआयने या गुन्ह्यात सहसंशयित केले आहे.
२०१२ च्या बॅचचे अधिकारी; १० वर्षांत संपत्तीची गगनभरारी
संशयित अजय कुमार हे २०१२ च्या बॅचचे आयडीईएस (IDES) अधिकारी आहेत. सीबीआयने १ जानेवारी २०१४ ते १३ जून २०२४ या १० वर्षांच्या कालावधीतील त्यांच्या कायदेशीर मालमत्तेचा आणि उत्पन्नाचा कसून तपास केला. या तपासातून समोर आलेली आकडेवारी थक्क करणारी आहे:
सुरुवातीची मालमत्ता: तपास सुरू होण्यापूर्वी अजय कुमार यांच्याकडे अवघे ५२,४२८ रुपये होते.
तपासअंती मालमत्ता: १० वर्षांचा तपास कालावधी पूर्ण होईपर्यंत हा आकडा तब्बल ५ कोटी ५९ लाख ६७ हजार ८१५ रुपयांवर पोहोचला.
५ कोटी कमवले आणि ५ कोटी खर्च केले, तरीही कोट्यवधी शिल्लक!
सीबीआयच्या तपासात अजय कुमार यांच्या कमाई आणि खर्चाचे धक्कादायक गणित समोर आले आहे. या १० वर्षांच्या काळात त्यांचे अधिकृत उत्पन्न साधारण ५.०४ कोटी रुपये होते, तर त्यांनी ५.१७ कोटी रुपये खर्च केले. नियमानुसार त्यांची अपेक्षित बचत उणे किंवा फक्त १३.६४ लाख रुपये असायला हवी होती. असे असतानाही त्यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आढळली. या अतिरिक्त संपत्तीचा कोणताही कायदेशीर स्त्रोत ते सीबीआयला देऊ शकले नाहीत.
सीबीआय तपासातील अजय कुमार यांच्या संपत्तीचा ताळेबंद:
तपशील रक्कम (रुपयांमध्ये)
तपास सुरू होण्यापूर्वीची एकूण संपत्ती५२,४२८.५६
तपास कालावधी पूर्ण झाल्यानंतरची संपत्ती५,५९,६७,८१५.००
तपास कालावधीतील अधिकृत उत्पन्न५,०४,२८,९२४.००
तपास कालावधीतील एकूण खर्च५,१७,९३,०४४.००
अपेक्षित कायदेशीर बचत१३,६४,१२०.००
एकूण बेहिशेबी मालमत्ता (DA)५,७२,७९,५०६.४४
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सीबीआयच्या पुढील पावलाकडे लक्ष
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार कायमच वेगवेगळ्या कारणांनी संशयाच्या घेऱ्यात असतो, आता त्यात या हाय-प्रोफाइल सीबीआय गुन्ह्याची भर पडली आहे. इतका मोठा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात अडकल्याने बोर्डाचे इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सीबीआयच्या या सखोल तपासात अजून कोणते मोठे मासे गळाला लागणार आणि काय काय धक्कादायक बाबी निष्पन्न होणार, याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.