येवल्यात समीर भुजबळांच्या उपस्थितीत महायुतीच्या नगरसेवकांची बैठक... काय निर्णय झाला त्यात?

Share:
Main Image
Last updated: 05-Jul-2026

येवला, (प्रतिनिधी) ५ जुलै - येवला शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी महायुतीच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवला संपर्क कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विकास योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकार काम करत आहे. त्याच धर्तीवर येवला नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना व घटक पक्षातील सर्व नगरसेवकांनी एकत्रित काम करण्याचा निर्धार या बैठकीत केला गेला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी महायुतीच्या सर्व नगरसेवकांशी संवाद साधत शहराच्या विकासाच्या दृष्टीने एकजुटीने आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन विकासाच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत. नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करून कामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

येवला शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटारी, पथदिवे तसेच इतर पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्न आगामी काळात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शहरातील प्रलंबित विकासकामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल. अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांना आगामी काळात गती देण्यात येईल, असा विश्वास समीर भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, येवला शहराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेली विविध कामे आगामी काळात मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.

या बैठकीत महायुतीतील घटक पक्षांच्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील विविध समस्या आणि आवश्यक विकासकामांची माहिती मांडली. नगरसेवकांनी मांडलेल्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून त्यावर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. 

Advertisement

तसेच माजी समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवला शहरात महायुतीचे काम अधिक जोमाने आणि एकजुटीने करण्यात येईल. शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवक समन्वयाने काम करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांनी यावेळी व्यक्त केला. 

यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी महायुतीच्या नगरसेवकांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना गटनेते गणेश शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व नगरसेवक येवल्याच्या विकासासाठी महायुती म्हणून एकत्र येत आहोत. सर्व घटकपक्ष एकत्र काम करत असताना येवल्याच्या विकासाला अधिक गती प्राप्त होईल.

यावेळी भाजपचे माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकार काम करत आहे. मंत्री छगन भुजबळ हेही राज्यातील महायुतीतील मोठे नेते आहे. आज भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना महायुती घटक पक्षातील सर्व नगरसेवक एकत्र येऊन काम करत आहेत हा सुवर्ण योग असून मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवल्याचा विकासाला अधिक गती मिळेल असे त्यांनी सांगितले.

यावेळी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ज्येष्ठ नेते हुसेन शेख, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे, गटनेते गणेश शिंदे, गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना व घटक पक्षातील नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. येवला शहराच्या विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून एकत्रित प्रयत्न करण्यात येणार असून, नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देत शहरातील अनेक विकासकामे आगामी काळात मार्गी लावण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.