निफाड, (प्रतिनिधी) ४ जुलै - तालुक्यातील गाजरवाडी शिवार येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून नात्यातीलच तिघांनी मायलेकांना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून, "एक-एकाचा काटा काढू," अशी उघड धमकी देण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात एका महिलेसह एकाच कुटुंबातील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णू पूंजा शिंदे, पंकज विष्णू शिंदे आणि एक महिला (सर्व रा. गाजरवाडी शिवार, ता. निफाड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत गिरीश शरद शिंदे (वय २३, रा. गाजरवाडी) या तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. संशयित आणि फिर्यादी हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक असून त्यांच्यात जुना कौटुंबिक वाद सुरू आहे.
मदतीला धावलेल्या आईलाही बेदम चोप
गेल्या २७ जून रोजी दुपारच्या सुमारास गिरीश शिंदे हा आपल्या घराच्या परिसरात असताना संशयितांनी त्यास गाठले व जुन्या वादावरून शिवीगाळ सुरू केली. वाद वाढल्याने संशयितांपैकी एकाने गिरीश याला घट्ट पकडून ठेवले, तर दुसऱ्याने लाकडी दांडक्याने त्याच्यावर बेदम हल्ला चढवला. आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून त्याची आई वाचवण्यासाठी धावून आली. मात्र, संतप्त संशयितांनी महिलेचाही मुलाहिजा न ठेवता तिलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
या प्राणघातक हल्ल्यात गिरीश गंभीर जखमी झाला आहे. मारहाण केल्यानंतर संशयितांनी "तुम्हाला सोडणार नाही, एक-एकाचा काटा काढू," अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर पीडित कुटुंबाने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.