नाशिक, (प्रतिनिधी) ४ जुलै - पेठ तालुक्यातील आंबे येथे रात्रीच्या मुक्कामासाठी थांबलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून अज्ञात चोरांनी तिकीट मशिन आणि दिवसभराची रोकड असलेली वाहकाची लोखंडी पेटी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाचे वाहक मोहन विठ्ठल भोये (रा. इंद्रप्रस्थनगर, पेठ रोड, नाशिक) यांनी या संदर्भात पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. २) भोये हे नाशिक-आंबे या मुक्कामी बसवर (क्रमांक: एमएच १४ बीटी ३६०३) सेवा बजावण्यासाठी गेले होते. रात्रीच्या वेळी आंबे येथील एसटी स्टँड परिसरात बस पार्क करून चालक आणि वाहक नेहमीप्रमाणे बसमध्येच झोपी गेले होते.
दरवाजा उघडून पेटारा लंपास
मध्यरात्रीच्या सुमारास चालक-वाहक गाढ झोपेत असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बसचा दरवाजा शिताफीने उघडला. त्यांनी थेट वाहकाच्या आसनाजवळ (सीट) ठेवलेली लोखंडी पेटी पळवून नेली. या पेटीत प्रवाशांकडून गोळा झालेली दिवसभराची रोख रक्कम आणि महामंडळाचे मौल्यवान तिकीट मशीन असा एकूण सुमारे १२ हजार रुपयांचा ऐवज होता.
सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे मुक्कामी बसच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे. या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्याचे हवालदार डगळे पुढील तपास करीत आहेत.