आरोग्य विद्यापीठात लिपीक पदाचे आमिष... परिचितांकडूनच बेरोजगाराला ८ लाखांचा गंडा...

Share:
Main Image
Last updated: 03-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ जुलै - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात (MUHS) लिपीक पदावर कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका सुशिक्षित बेरोजगाराला तब्बल ८ लाख रुपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विश्वासू परिचितांनीच हा डल्ला मारला असून, तीन वर्षे उलटूनही नोकरी किंवा पैसे परत न मिळाल्याने अखेर हा सर्व प्रकार पोलीसात पोहोचला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत काशिनाथ सोनवणे, देविदास शरद ढोमसे (दोघे रा. सैलानी बाबा स्टॉपजवळ, जेलरोड) आणि विनोद दिवे (रा. पाण्याच्या टाकीजवळ, जेलरोड, नाशिक रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित भामट्यांची नावे आहेत. याप्रकरणी वर्षा राजेंद्र शिनकर (वय ६०, रा. सावरकर नगर, गंगापूर रोड) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ओळखीचा फायदा घेऊन जाळे विणले

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्षा शिनकर आणि संशयित आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. सन २०२३ मध्ये संशयितांनी शिनकर यांना गाठून 'आमची महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात मोठी ओळख आहे', असे भासवले. शिनकर यांचा मुलगा शुभम याला विद्यापीठात लिपीक (क्लार्क) या पदावर कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, असा ठाम विश्वास त्यांनी शिनकर कुटुंबियांना दिला. या बदल्यात संशयितांनी पैशांची मागणी केली.

८ लाख लाटले, पुढे फक्त 'टोलवाटोलवी'

Advertisement

मुलाच्या भविष्यासाठी शिनकर यांनी संशयितांवर विश्वास ठेवून सुरुवातीला ५ लाख रुपयांची रोकड त्यांच्या स्वाधीन केली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कॅनडा कॉर्नर शाखेतून उर्वरित ३ लाख रुपये संशयितांच्या बँक खात्यावर वर्ग (ट्रान्सफर) केले. अशा प्रकारे एकूण ८ लाख रुपये पदरात पाडून घेतल्यानंतर संशयितांनी नोकरीसाठी कोणतीही हालचाल केली नाही. शिनकर यांनी वारंवार विचारणा केली असता, संशयित वेळ मारून नेण्यासाठी विविध कारणे सांगत राहिले.

धमकी आणि शिवीगाळ

तब्बल तीन वर्षे उलटूनही मुलाला नोकरी लागली नाही आणि दिलेले पैसेही परत मिळत नसल्याने शिनकर कुटुंबियांनी संशयितांकडे पैशांचा तगादा लावला. मात्र, पैसे परत देण्याऐवजी संशयितांनी थेट शिवीगाळ करत दमदाटी व धमकी देण्यास सुरुवात केली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वर्षा शिनकर यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलीसांनी संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ठोके करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.