मुंबई/नाशिक, (प्रतिनिधी) २ जुलै - नाशिक जिल्हा रुग्णालयातील सीटी-स्कॅन मशीन बंद असल्यामुळे ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयातील सीटी-स्कॅन सेवा तातडीने पूर्ववत करण्यात यावी,अशी मागणी आमदार पंकज भुजबळ यांनी पावसाळी अधिवेशनात विशेष उल्लेखाच्या माध्यमातून करत शासनाचे लक्ष वेधले.
विधिमंडळ सभागृहात आमदार पंकज भुजबळ यांनी विशेष उल्लेखाचा प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, नाशिक जिल्हा रुग्णालय हे केवळ शहरापुरते मर्यादित नसून ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. सीटी-स्कॅन सेवा बंद असल्यामुळे अपघातग्रस्त तसेच इतर गंभीर रुग्णांचे वेळेवर निदान होत नाही. परिणामी अनेक रुग्णांना खासगी केंद्रांमध्ये जाऊन हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. यामुळे शासनाने बंद असलेले सीटी-स्कॅन मशीन तातडीने दुरुस्त करावे. दुरुस्तीस विलंब होणार असल्यास नवीन अत्याधुनिक सीटी-स्कॅन यंत्र तात्काळ उपलब्ध ही अत्यावश्यक सेवा पूर्ववत करण्याची मागणी आमदार पंकज भुजबळ यांनी सभागृहात केली.
सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित अशा अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही खंड पडू नये, यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही विनंती शासनाकडे केली. नाशिक जिल्हा रुग्णालयातील सीटी-स्कॅन मशीनचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा आणि गरीब रुग्णांना दिलासा मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.