एस.के. खेडकर, (नाशिक) १ जुलै - नाशिकरोड परिसरातील 'अमोल आईस्क्रीम पार्लर'चे पत्रे तोडून मध्यरात्री रोकड लांबवणाऱ्या सराईत चोरट्याला उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गौरव चंद्रशेखर पांडे (वय २०, रा. नारायण बापू नगर, गोदावरी सोसायटी, जेलरोड, नाशिक) याला अटक केली असून, त्याच्या एका विधीसंघर्षित (अल्पवयीन) मित्रालाही ताब्यात घेतले आहे. चोरट्याने गुन्हा करताना चेहरा पूर्णपणे झाकलेला असतानाही पोलिसांनी केवळ त्याच्या अंगावरील मळक्या कपड्यांच्या सुगाव्यावरून हा गुन्हा उघडकीस आणला.
पायली येथील आईस्क्रीम पार्लरमध्ये चोरी
गोसावी वाडी (शाहू महाराज पथ, सत्यम हॉल, पिंपळे अपार्टमेंट) येथील रहिवासी हार्दिक प्रकाश दंडगव्हाण (वय २१) यांचे आईस्क्रीम पार्लर आहे. २७ जून २०२६ रोजी रात्री ११:३० ते २८ जून २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाचा पत्रा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने काउंटरचा ड्रावर उघडून त्यातील रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा (गुरंन. ४०८/२०२६, बीएनएस कलम ३०५(अ), ३३१(४)) दाखल करण्यात आला होता.
असा लागला छडा: सीसीटीव्ही आणि गॅरेज कनेक्शन
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ व पोलीस निरीक्षक डंबाळे यांनी गुन्हेशोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. उपनिरीक्षक सोनवणे आणि पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरट्याने चेहरा पूर्णपणे झाकलेला असल्याने ओळख पटवणे कठीण होते.
परंतु, पोलिसांनी बारकाईने निरीक्षण केले असता चोरट्याच्या अंगावर मळलेले (ऑईलचे) कपडे असल्याचे दिसून आले. त्यावरून हा चोरटा आजूबाजूच्या एखाद्या गॅरेजमध्ये काम करत असावा, असा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी परिसरातील सर्व गॅरेजेस पिंजून काढले आणि एका गॅरेजमधील सीसीटीव्ही फुटेजशी शरीरयष्टी मिळत्याजुळत्या असलेल्या संशयित गौरव पांडे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या अल्पवयीन मित्राच्या मदतीने गुन्ह्याची कबुली दिली.
४७ हजारांचा मुद्देमाल जप्त; आणखी एक गुन्हा उघड
पोलिसांनी आरोपीकडून २७,५५० रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. तसेच मागील डिसेंबर महिन्यात केलेल्या एका चोरीच्या पैशातून खरेदी केलेली २०,००० रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एमएच १५ ए.डब्ल्यू ९९८३) असा एकूण ४७,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या अटकेमुळे उपनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे (गुरंन. ०२/२०२६ आणि गुरंन. ४०८/२०२६) उघडकीस आले आहेत.
या पथकाने केली कामगिरी:
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (परिमंडळ २) किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (नाशिक रोड विभाग) श्रीमती अदिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि जयंत शिरसाठ, पोनि डंबाळे, पौनि प्रभाकर सोनवणे, पोहवा विनोद लखन, संदीप पवार, पोअं योगेश जाधव, पंकज कर्पे, संदेश रघतवान, सुरज गवळी, सुनील गायकवाड, जयंत शिंदे, गौरव गवळी, प्रशांत देवरे, आणि अनिल शिंदे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा संदीप पवार करत आहेत.