दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १ जुलै - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना दर्जेदार, तत्पर आणि अखंड आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये, वैद्यकीय संघटना आणि सेवाभावी संस्थांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने उभारण्यात येणाऱ्या आरोग्य पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर होण्यासाठी सर्व घटकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने आयोजित आरोग्य यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कपिल आहेर, एमपीजीआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्यंकट गिते, एसएमबीटी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, आयएमए च्या सचिव डॉ. मनीषा जगताप, महानगरपालिकेचे वित्त अधिकारी संजय बैरागी यांच्यासह जिल्ह्यातील वैद्यकीय तज्ज्ञ, रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रुग्णालयांचे मॅपिंग आणि डिजिटल बेड मॅनेजमेंट करा
डॉ. गेडाम पुढे म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या आरोग्य पायाभूत सुविधांची माहिती जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय संघटना व आरोग्य संस्थांना दिली जावी. भाविकांना उपचारासाठी रुग्णालय सहज उपलब्ध व्हावे यासाठी आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सेवा देणाऱ्या रुग्णालयांचे मॅपिंग करण्यात यावे. तसेच प्रत्येक रुग्णालयातील उपलब्ध खाटांची (बेड्स) अद्ययावत माहिती डिजिटल पद्धतीने उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. संभाव्य साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने विशेष दक्षता घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचेही काटेकोर नियोजन: शेखर सिंह
सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, पर्वणीच्या काळात बाहेरील भाविकांबरोबरच ग्रामीण व शहरी भागातील स्थानिक नागरिकांनाही वेळेवर आणि योग्य आरोग्य सेवा मिळेल, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे.
खासगी रुग्णालयांच्या सहभागासाठी 'तीन पर्याय'
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सिंहस्थ काळात जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचा सहभाग निश्चित करण्यासाठी शासनाने तीन पर्याय निश्चित केल्याची माहिती दिली:
पहिला पर्याय: सार्वजनिक आरोग्य सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिली जाईल, तर संबंधित रुग्णालये मनुष्यबळ, औषधे व सेवा पुरवतील.
दुसरा पर्याय: खासगी रुग्णालये त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी भाविकांना वैद्यकीय सेवा देतील.
तिसरा पर्याय: डॉक्टर आपल्या नियमित सेवेसह कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त आरोग्य सेवा उपलब्ध करून देतील.
पर्वणीच्या कालावधीत रुग्णालयांमध्ये आपत्कालीन रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध राहतील, याचे नियोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या बैठकीत उपस्थित विविध वैद्यकीय संस्थांच्या प्रतिनिधींनीही उपयुक्त मार्गदर्शक सूचना केल्या.