मनोहर शिंदे, (नाशिक) ३० जून - भारतीय शेअर बाजारात आगामी काळात तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठी घडामोडी पाहायला मिळणार आहे. नाशिक मुख्यालय असलेली अग्रगण्य क्लाउड सेवा आणि डेटा सेंटर क्षेत्रातील कंपनी 'ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन्स लिमिटेड' (ESDS Software Solutions) आपला आयपीओ (IPO) बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या आयपीओसह 'ईएसडीएस' ही भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध (List) होणारी देशातील पहिली 'डेटा सेंटर आणि सॉव्हरिन क्लाउड' कंपनी ठरण्याची शक्यता आहे.
असा आहे 'केजी क्लास' ते 'आयपीओ'पर्यंतचा अद्भुत प्रवास
'ईएसडीएस'चा इतिहास हा कोणत्याही नवउद्योजकासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. अवघ्या ३५,००० रुपयांच्या भांडवलावर आणि नाशिकमधील एका बालवाडीच्या (Kindergarten) वर्गखोलीत केवळ एका साध्या सपोर्ट डेस्कपासून या कंपनीची सुरुवात झाली होती. पहिल्या पिढीतील तरुण तंत्रज्ञ आणि उद्योजक पीयूष सोमाणी (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) यांनी २००५ मध्ये ही कंपनी सुरू केली. कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना, केवळ "भारतातील डेटा हा भारताच्याच मालकीचा असावा" या एकाच जिद्दीने त्यांनी 'ईएसडीएस'चे साम्राज्य उभे केले.
बँकिंग आणि शासकीय क्षेत्रातील विश्वसनीय नाव
आज 'ईएसडीएस'चे नाशिक, नवी मुंबई, बेंगळुरू आणि मोहाली येथे ४ अत्याधुनिक 'टियर-३' (Tier III) प्रमाणित डेटा सेंटर्स कार्यरत आहेत. कंपनीकडे स्वतःचे पेटंट असलेले 'व्हर्टिकल ऑटो-स्केलिंग' क्लाउड तंत्रज्ञान असून, केंद्र सरकारच्या 'MeitY' (इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय) कडून त्यांची क्लाउड सेवा मान्यताप्राप्त आहे.
सध्या देशातील ४०० हून अधिक सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया कॅपिटल, युनियन बँक, सिडबी तसेच २५० हून अधिक शासकीय संस्था आणि ६०० पेक्षा जास्त मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचा डेटा ईएसडीएसच्या क्लाउडवर सुरक्षितपणे चालवला जातो.
आता लक्ष्य 'AI' आणि जागतिक विस्तारावर
ग्लोबल एन्व्हायर्नमेंट फंड (GEF) सारख्या जागतिक गुंतवणूकदारांची पाठराखण असलेल्या ईएसडीएसने आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने नाशिकमध्ये अद्ययावत 'AI Incubation Centre' सुरू केले असून, त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर एनव्हिडिया (NVIDIA) जीपीयूट्रॅक्सचा वापर करून एआय तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.
गुंतवणूकदारांचे लक्ष
देशात वाढणारे डिजिटलायझेशन, ५जी तंत्रज्ञान आणि स्थानिक डेटा सुरक्षिततेचे (Data Sovereignty) वाढते महत्त्व या पार्श्वभूमीवर डेटा सेंटर्सना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे 'ईएसडीएस'चा हा प्रस्तावित आयपीओ गुंतवणूकदारांसाठी आणि विशेषतः नाशिककरांसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि फायदेशीर ठरण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी वर्तवली आहे.