नाशिककरांची परीक्षाच... ३० जून ते ३ जुलै दरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल...

Share:
Main Image
Last updated: 29-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २९ जून - संत श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे ३० जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान होत असून, हा सोहळा नाशिक शहरात दाखल होणार आहे. पालखी मार्गावर वारकरी व भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, शहरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी नाशिक शहर पोलिसांनी वाहतूक मार्गात मोठे बदल केले आहेत. ३० जून रोजी सकाळी ६:०० वाजेपासून ते ३ जुलै रोजी पालखी शहराच्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत हे बदल लागू राहतील, अशी माहिती पोलीस उप आयुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी अधिसूचनेद्वारे दिली आहे.

पालखीचा नाशिक शहरातील मुक्काम व मार्गक्रमण:

३० जून २०२६: पालखी त्र्यंबकेश्वर येथून निघून रात्री नाशिक शहरातील सातपूर हद्दीत मुक्कामासाठी थांबेल.

१ जुलै २०२६: सकाळी सातपूर येथून प्रस्थान करून पंचायत समिती, रामतीर्थ, काळाराम मंदिर मार्गे गणेशवाडी, पंचवटी येथे रात्रीचा मुक्काम करेल.

२ जुलै २०२६: सकाळी अमरधाम रोड, ट्रॅक्टर हाऊस, काठेगल्ली मार्गे नाशिकरोड येथे आगमन व भोजन होईल. त्यानंतर दुपारी प्रस्थान करून छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाशिकरोड मार्गे पळसे गाव येथे रात्रीचा मुक्काम असेल.

३ जुलै २०२६: सकाळी पळसे येथून पुणे रोडने पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.

प्रमुख बंद मार्ग आणि पर्यायी मार्ग (३० जून ते ३ जुलै):

१. त्र्यंबकेश्वर रोड (३० जून ते १ जुलै):

बंद मार्ग: त्र्यंबकेश्वर रोडने नाशिककडे येणाऱ्या डाव्या बाजूच्या मार्गावर सकाळ सर्कल ते संस्कृती हॉटेलपर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंदी असेल.

पर्यायी मार्ग: त्र्यंबकेश्वरकडून येणारी वाहतूक एबीबी सिग्नल, संस्कृती हॉटेल ते महिंद्रा सर्कल यादरम्यान दुहेरी सुरू राहील. तसेच इतर वाहतूक पाथर्डी फाटा, आयटीआय सिग्नल मार्गे वळवण्यात आली आहे.

Advertisement

मायको सर्कल ते एबीबी सिग्नल: दोन्ही बाजूंनी सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. वाहनधारकांनी मायको सर्कल - उंटवाडी रोड - संभाजी चौक मार्गे प्रवास करावा.

२. पंचवटी व मध्य नाशिक परिसर (१ जुलै ते २ जुलै):

मोडक सिग्नल ते अशोकस्तंभ: एका बाजूने वाहतूक बंद राहील, तर दुसऱ्या बाजूने दुहेरी वाहतूक सुरू असेल.

अशोकस्तंभ ते रविवार कारंजा: सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. वाहतूक रामवाडी, बायजाबाई छावणी मार्गे वळवली आहे.

रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंट - गाडगे महाराज पुतळा - फुले मार्केट: प्रवेश बंद राहील. वाहनांनी सांगली बँक सिग्नल, नेहरू गार्डन, शालिमार मार्गे जावे.

महात्मा फुले मार्केट ते काजीपुरा पोलीस चौकी: प्रवेश बंद राहील. वाहतूक दूधबाजार, खडककाळी, सारडा सर्कल मार्गे जाईल.

३. नाशिकरोड व पुणे रोड परिसर (२ जुलै ते ३ जुलै):

नाशिक-पुणे रोड (द्वारका, काठेगल्ली ते नाशिकरोड): एका बाजूचा मार्ग बंद राहील. दुसऱ्या बाजूने दुहेरी वाहतूक सुरू असेल.

दत्तमंदिर सिग्नल ते बिटको चौक - शिवाजी पुतळा: अवजड वाहने, एसटी बसेस आणि हातगाड्यांना पूर्णपणे प्रवेश बंद असेल. अवजड वाहने मिरची ढाब्याकडून टाकळी, नांदूर नाका, जेलरोड मार्गे बिटकोकडे जातील.

अत्यावश्यक सेवांना सवलत; नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा वाहतूक बदल दिंडीतील वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नाही. मात्र, सर्वसामान्य नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम १९८८ आणि मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदींनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.