धक्का द्यायच्या, दागिने चोरायच्या... महिला टोळीला पोलिसांनी असे केले जेरबंद...

Share:
Main Image
Last updated: 29-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २९ जून - पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाजीपाला मार्केट परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या परराज्यातील महिलांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत चाणाक्षपणे तपास करत मध्यप्रदेशातील दोन सराईत महिला आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींची नावे उषा किशोर सकटे (वय ५० वर्ष) आणि पौर्णिमा किशोर सकटे (वय ३० वर्ष) (दोन्ही रा. जुन्या झोपडपट्टीजवळ, भोपाळ चौरस्ता, देवास, जि. इंदूर, राज्य- मध्यप्रदेश) अशी आहेत.

धक्का देऊन चोरायच्या दागिने

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला भाजीपाला खरेदी करत असताना या संशयित महिलांनी त्यांना मुद्दाम धक्का दिला. या गडबडीचा फायदा उठवून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व पर्समधील रोख रक्कम चोरून त्या पसार झाल्या होत्या. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांमुळे लागला सुगावा

Advertisement

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सपोनि सतिश शिरसाठ व त्यांच्या अंमलदारांनी मार्केट यार्ड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन्ही संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

घरफोडीच्या गुन्ह्याचीही कबुली!

महिला आरोपींची अधिक तपासणी केली असता, त्यांनी पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील आणखी एका घरफोडीच्या गुन्ह्याची (गुन्हा रजि. नं. २५/२०२६, BNS कलम ३०५(अ), ३३१(३), ३(५)) कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण २,५०,०००/- रुपयांचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण आणि रोख ६,०००/- रुपये असा एकूण २,५६,३००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तपास पथकाचे कौतुक

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहा. पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सतिश शिरसाठ आणि त्यांच्या संपूर्ण गुन्हे शोध पथकाने केली आहे. या धडक कारवाईमुळे पंचवटी परिसरातील व्यापारी आणि महिला वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. पुढील तपास पोहवा/१२०६ कुलकर्णी करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.