नाशिक, (प्रतिनिधी) २९ जून - ‘सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः’ (सर्वजण सुखी आणि रोगमुक्त राहोत) या भारतीय तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेत, नाशिकच्या एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ MEDICAL सायन्सेस अँड रिसर्च सेंटर येथे एक आठवड्याचा विशेष शैक्षणिक उपक्रम नुकताच पार पडला. अलीकडच्या काळात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नातेसंबंधात वाढणारा तणाव विचारात घेऊन, हे नाते अधिक संवेदनशील, सुदृढ आणि विश्वासार्ह करण्यासाठी एसएमबीटीने एक मोठा आंतरराष्ट्रीय करार केला आहे. हा शैक्षणिक करार एसएमबीटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, स्पेनमधील युनिव्हर्सिटी पॉम्पेऊ फॅब्रा (बार्सिलोना) आणि ‘The Doctor as a Humanist’ या जागतिक चळवळीमध्ये करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी बार्सिलोना येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ प्रा. जोनाथन मॅकफर्लंड विशेष रूपाने उपस्थित होते.
वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम
या धोरणात्मक करारांतर्गत, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांप्रती दया, सहानुभूती आणि सेवाभाव टिकवून ठेवण्यासाठी विशेष पावले उचलली जाणार आहेत:
‘Humanism in Medicine’ अभ्यासक्रम: वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी हा विशेष अभ्यासक्रम भारताच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) नियमावलीनुसार तयार केला जाईल.
संयुक्त उपक्रम: दोन्ही संस्थांमध्ये संयुक्त संशोधन, शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी व शिक्षकांची देवाणघेवाण आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जातील.
डिजिटल युगातही 'मानवी स्पर्श' महत्त्वाचा: प्रा. मॅकफर्लंड
आपल्या दौऱ्यात प्रा. मॅकफर्लंड यांनी एसएमबीटीच्या इगतपुरी कॅम्पसमधील मेडिकल, डेंटल, आयुर्वेद, नर्सिंग, फिजिओथेरपी आणि फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी विशेष 'मास्टरक्लास' घेतला. डिजिटल युगातही रुग्णांशी जिव्हाळ्याचे आणि विश्वासार्ह संबंध कसे टिकवून ठेवावेत, तसेच तंत्रज्ञानाचा वापर करताना 'मानवी स्पर्श' कसा जपावा, याचे मार्गदर्शन त्यांनी केले.
तसेच स्थानिक आरोग्यसेवा समजून घेण्यासाठी त्यांनी एसएमबीटीच्या एकदरे येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राला आणि कोळवाडे येथील आदिवासी आश्रमशाळेला भेट देऊन कौतुक केले.
एसएमबीटीची ‘We CARE’ मूल्ये अधिक दृढ होणार
उद्याचे डॉक्टर केवळ लॅब रिपोर्ट किंवा आधुनिक यंत्रांवर अवलंबून न राहता रुग्णांमधील माणूस ओळखणारे असावेत, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. हा करार एसएमबीटीच्या ‘We CARE’ (आरोग्य, सहानुभूती, सातत्याने शिकण्याची वृत्ती, आदर आणि व्यावसायिकता) या मूलतत्त्वांना अधिक बळकटी देणारा ठरेल, असा विश्वास डॉ. मीनल मोहगावकर (संचालक, शिक्षण, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट) यांनी व्यक्त केला.
"ग्रामीण भागात एसएमबीटीचे कार्य अतुलनीय"
"एसएमबीटी संस्थेने ग्रामीण आणि आदिवासी भागात उभे केलेले आरोग्यसेवांचे जाळे कौतुकास्पद आहे. भारतातील समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि घट्ट सामाजिक बंध हे वैद्यकीय क्षेत्रात मानवतावादी दृष्टिकोन रुजविण्यासाठी जगभरासाठी आदर्श आहेत. मी स्वतः एसएमबीटीच्या आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये 'शिरोधारा' उपचाराचा अनुभव घेतला. एसएमबीटीसोबतच्या या करारामुळे वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा देण्याचा आमचा प्रयत्न असेल."
— प्रा. जोनाथन मॅकफर्लंड (संस्थापक-अध्यक्ष, 'The Doctor as a Humanist', स्पेन)