दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २७ जून - नाशिकची अग्रगण्य अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील (इन्फ्रास्ट्रक्चर) कंपनी असलेल्या 'अशोका बिल्डकॉन'ने (Ashoka Buildcon) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी झेप घेतली आहे. कंपनीला गयाना (Guyana) देशातून तब्बल ३३४ कोटी रुपयांचे नवीन कंत्राट मिळाले आहे. गयानाच्या 'सेंट्रल हाउसिंग अँड प्लॅनिंग अथॉरिटी'कडून (CHPA) कंपनीला या कामाचे मंजुरी पत्र (Letter of Acceptance - LoA) प्राप्त झाले आहे.
२० महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
या नवीन कंत्राटानुसार, अशोका बिल्डकॉनला गयाना देशातील रिजन नंबर ३ मधील 'लॉट ८' अंतर्गत 'व्हर्साय' (Versailles - वेस्ट बँक डेमेरारा) ते 'पारिका' (Parika - ईस्ट बँक एसेक्विबो) दरम्यान ४ पदरी (Four-Lane) हायवेचे बांधकाम करायचे आहे. या प्रकल्पाच्या कामाची व्याप्ती मोठी असून, कंपनीला हे काम २० महिन्यांच्या विहित मुदतीत पूर्ण करावे लागणार आहे.
या आंतरराष्ट्रीय कंत्राटामुळे अशोका बिल्डकॉनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, नाशिकच्या उद्योग जगतातून कंपनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.