मुंबई, (प्रतिनिधी) २७ जून - विदेशी सोन्याच्या बेकायदेशीर तस्करीविरोधात एक मोठी मोहीम फत्ते करत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मुंबई विमानतळावरून चालणाऱ्या एका अत्यंत संघटित आणि हायटेक सोने तस्करी सिंडिकेटचा यशस्वीपणे पर्दाफाश केला आहे. डीआरआयने मुंबई, बेंगळुरू, हैदराबादसह देशातील विविध भागांत केलेल्या धडक कारवायांमध्ये तब्बल २३ कोटी रुपये किमतीचे १५ किलो विदेशी बनावटीचे सोने आणि ४५ किलो चांदी जप्त केली आहे. या संपूर्ण रॅकेटप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईत 'सोने वितळवणाऱ्या' केंद्राचा उद्ध्वस्त; विमानतळ कर्मचारीही सामील
मुंबई विमानतळावर कार्यरत असलेल्या या टोळीमध्ये अंतर्गत सुरक्षा आणि प्रवेशाचा गैरफायदा घेतला जात असल्याचे समोर आले आहे. डीआरआयने मुंबईतील तस्करीच्या सोन्याची साखळी मोडून काढत, विदेशी सोने वितळवण्यासाठी वापरण्यात येणारे गुप्त केंद्र शोधून काढले. येथून सुमारे ६ किलो विदेशी बनावटीचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले.
या कारवाईत संपूर्ण साखळीत सामील असलेल्या एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये विमानतळावरील एका महिला कर्मचाऱ्याचा, तिच्या हँडलरचा, तीन मध्यस्थांचा (ब्रोकर्स), सोने वितळवणाऱ्या केंद्राच्या ऑपरेटरचा आणि या प्रक्रियेत थेट गुंतलेल्या अन्य तीन व्यक्तींचा समावेश आहे. पकडले जाण्यापासून वाचण्यासाठी हे आरोपी विविध थरांमध्ये काम करत होते.
बेंगळुरूमध्ये अंतर्वस्त्रात 'पेस्ट' स्वरूपात सोन्याची लपवाछपवी
बेंगळुरू येथे करण्यात आलेल्या दुसऱ्या एका कारवाईत, आंतरराष्ट्रीय प्रवाशाने आपल्या कपड्यांच्या आणि अंतर्वस्त्रांच्या थरांमध्ये अत्यंत चतुराईने लपवून आणलेले १.८ किलो २४ कॅरेट वजनाचे पेस्टच्या (मिश्रण) स्वरूपातील सोने जप्त करण्यात आले. डीआरआयने या प्रवाशाच्या घराची झडती घेतली असता, तिथे आणखी १.५ किलो सोन्याचे दागिने, ४५ किलो चांदी आणि भारतीय व विदेशी चलन हस्तगत करण्यात आले. या प्रवाशालाही तात्काळ अटक करण्यात आली आहे.
देशभर सत्र; विशाखापट्टणम, हैदराबाद, राजकोटमध्येही छापे
या आठवड्याच्या सुरुवातीला डीआरआयने आपला तपासाचा फास अधिक आवळत हैदराबाद, राजकोट, कालिकत, विशाखापट्टणम, गुवाहाटी आणि पेट्रापोल येथील विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर एकाच वेळी अनेक मोहिमा राबवल्या. या मोहिमांमधून परदेशी बनावटीचे आणखी ६ किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले असून याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
सोन्याची तस्करी करण्यासाठी गुन्हेगार आता नवनवीन आणि अत्याधुनिक पद्धतींचा वापर करत असून, विमानतळाच्या आतील कर्मचाऱ्यांनाच हाताशी धरत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.