मालेगाव, (प्रतिनिधी) २६ जून - महिलेशी फोनवर वारंवार संपर्क साधून त्रास देत असल्याच्या कारणावरून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला दोघांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मालेगाव तालुक्यातील कोठरे बुद्रुक येथे घडली आहे. या मारहाणीत संशयितांनी मुलाला उचलून जमिनीवर आपटल्याने त्याचा उजवा हात फॅक्चर झाला आहे. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर बुवाजी पवार आणि निलेश आण्णू पवार (दोघे रा. कोठरे बु., ता. मालेगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत जखमी अल्पवयीन मुलगा सागर सुनील पवार (वय १७) याने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
लग्नाच्या वरातीत गाठून मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर पवार हा सोमवार, दिनांक २२ रोजी आपल्या मामाच्या गावातील एका लग्नकार्यात गेला होता. लग्नाच्या वरातीत तो नाचत असताना संशयित आरोपी शंकर पवार आणि निलेश पवार यांनी त्याला गाठले.
"तू आमच्या घरातील महिलांशी मोबाईलवर संपर्क साधून का त्रास देतोस?" असा जाब विचारत संशयितांनी सागरला जागीच हटकले आणि वाद घालण्यास सुरुवात केली.
उचलून जमिनीवर आपटले
हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही संशयितांनी सागरला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. इतक्यावरच न थांबता संशयितांनी त्याला थेट उचलून अत्यंत निर्दयतेने जमिनीवर आपटले. या भीषण हल्ल्यामुळे सागरच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत होऊन त्याचा हात फॅक्चर झाला.
घटनेनंतर जखमी मुलाच्या तक्रारीवरून वडनेर खाकुर्डी पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक बाचकर करत आहेत.