नाशिक, (प्रतिनिधी) २६ जून - शहरात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे चित्र असून खुनाच्या घटनांचे सत्र थांबायला तयार नाही. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळाली गावात जुन्या वादाची ठिणगी पडून एका ३७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशाल सीताराम माळवे (वय ३७, रा. सुवर्ण सोसायटी, देवळाली गाव) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्याचा मित्र असलेल्या संशयित आरोपीला तातडीने ताब्यात घेतले आहे.
पार्टीदरम्यान वाद विकोपेला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विशाल माळवे आणि त्याचा मित्र संशयित अमोल गायकवाड (वय ३९) हे दोन्ही गुरुवारी रात्री उशिरापर्यंत एकत्र पार्टी करत बसले होते. मात्र, पार्टी सुरू असतानाच त्यांच्यात जुन्या कुठल्यातरी कारणावरून अचानक वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद इतका विकोपेला गेला की त्याचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. नशेत असलेल्या अमोल गायकवाड याने रागाच्या भरात धारदार हत्यार काढून विशालवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेला विशाल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्याचा जागीच मृत्यू झाला.
घरात लपलेल्या संशयिताला बेड्या
घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेची गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलीस निरीक्षक डबाळे, उपनिरीक्षक विशाल सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार संदीप पवार, विनोद लखन, जयंत शिंदे, अनिल शिंदे आणि योगेश झाडे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी संशयित अमोल गायकवाड याच्या घराची झडती घेतली असता, तो घरातच लपून बसलेला आढळला. घटनेनंतर तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मयत विशाल हा विवाहित असून, त्याच्या अचानक जाण्याने माळवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शहरातील खुनांच्या सत्राने नागरिक भयभीत
काही दिवसांपूर्वीच तपोवन परिसरात एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला होता, तर सातपूरमधील कामगार नगर येथील एका इमारतीच्या टेरेसवर एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटना ताज्या असतानाच आता नाशिकरोड परिसरातील देवळाली गावात नशेत असलेल्या मित्रानेच मित्राचा काटा काढल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस करत आहेत.