मुंबई, (प्रतिनिधी) २६ जून - नाशिकची चिमुकली श्रेयांका कुलकर्णी हिने अवघ्या ५ मिनिटे २ सेकंदांत संपूर्ण 'रामरक्षा स्तोत्रा'चे अस्खलित पठण करून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. श्रेयांकाच्या या अद्भूत कौशल्याची दखल थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी श्रेयांका आणि तिच्या कुटुंबाची भेट घेऊन तिचा विशेष गौरव केला. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रेयांकासोबत स्वतः बसून रामरक्षा पठण करण्याचा आनंदही घेतला.
लहान वयातील संस्कार आणि संस्कृत प्रभुत्व प्रेरणादायी
या भेटीचे फोटो आणि माहिती मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर शेअर करत श्रेयांकाचे भरभरून कौतुक केले आहे.
"नाशिकच्या श्रेयांका कुलकर्णी या चिमुकलीने अवघ्या ५ मिनिटे २ सेकंदांत संपूर्ण रामरक्षा स्तोत्राचे पठण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आज तिच्यासोबत रामरक्षा पठण करण्याचा आनंद लाभला. इतक्या लहान वयात संस्कार, संस्कृतवरील प्रभुत्व आणि भारतीय संस्कृतीप्रती असलेली तिची निष्ठा खरोखरच प्रेरणादायी आहे. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद तिच्यावर सदैव राहो," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
पावसाळी अधिवेशनात रंगली 'रामरक्षा'
सध्या मुंबईत राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मुख्यमंत्र्यांनी कुलकर्णी कुटुंबाला भेटीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी श्रेयांकाचे आई-वडील आणि तिचा लहान भाऊ देखील तिच्यासोबत उपस्थित होते. नाशिकच्या चिमुकलीने मुंबईत मुख्यमंत्र्यांसमोर केलेल्या या सादरीकरणामुळे आणि मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या या शाबासकीमुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.