राज्यात मान्सून सक्रिय... कुठे धुमशान? कुठे जोरदार? असा आहे पावसाचा अंदाज...

Share:
Main Image
Last updated: 24-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २४ जून - यंदाच्या 'एल-निनो'च्या वर्षात अखेर मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून आता तो गुजरात आणि मध्य प्रदेशच्या दिशेने आगेकूच करत आहे. या पार्श्वभूमीवर, उद्यापासून (२५ जून) सुरू होणारा आणि १ जुलैपर्यंतचा जूनचा शेवटचा आठवडा हा महाराष्ट्रासाठी मान्सूनच्या जोरदार पावसाचे पहिले मोठे आवर्तन ठरेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर उद्यापासून पावसाचे 'धूमशान' पाहायला मिळणार असून, उर्वरित महाराष्ट्रातही आठवडाभर पाऊस सक्रिय राहणार आहे.

कोकणात मुसळधार; मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा

गेल्या दोन दिवसांत मुंबईत झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधा-तिरपीट उडवली होती. मात्र, उद्यापासून सुरू होणाऱ्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात यापेक्षाही अधिक तीव्रतेचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातील जोरदार पावसामुळे खान्देश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही १ जुलैपर्यंत कमी-अधिक तीव्रतेच्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे.

नद्यांना पूर येण्याची शक्यता; 'या' ३ जिल्ह्यात हायअलर्ट!

कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे येत्या ३ दिवसांत प्रमुख नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रामुख्याने खालील ३ जिल्ह्यांतील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊ शकते:

रत्नागिरी व सिंधुदुर्ग: वशिष्ठी, शास्त्री, सावित्री, काजळी, बुरोंडी, वागोठाण, देवगड, कारली, गड, तेरेखोल आणि तिलारी.

Advertisement

कोल्हापूर: पंचगंगा, वारणा, दूधगंगा आणि हिरण्यकेशी.

नदीकाठच्या नागरिकांनी आणि प्रशासनाने यादरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तापमानात घसरण; उकाड्यापासून दिलासा

पावसाच्या धडाकेबाज एन्ट्रीमुळे संपूर्ण राज्यातील तापमानात मोठी घसरण होणार असून नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळणार आहे.

कमाल तापमान (दिवसा): मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर दुपारचे कमाल तापमान थेट ३० अंश सेल्सिअसच्या आसपास खाली येईल. उर्वरित महाराष्ट्रात ते ३४ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्यामुळे दिवसाचा उकाडा कमी होईल.

किमान तापमान (रात्री): संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जाईल, ज्यामुळे रात्रीचा गारवा वाढेल.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.