जगातील सर्वात कठीण ८६ किलीमीटरचे अंतर ११ तास २८ मिनिटांत केले पार... नाशिकच्या डॉ. गोपाळ शिंदे यांचा आफ्रिकेत पराक्रम...

Share:
Main Image
Last updated: 23-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २३ जून - दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या जगातील सर्वात जुन्या आणि धावपटूंसाठी अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या 'कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२६' (Comrades Marathon 2026) मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 'महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च' (MPGIMER) येथील अस्थिरोग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. गोपाळ शिंदे यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डर्बन ते पीटरमॅरिट्झबर्ग दरम्यानचे तब्बल ८६ किलोमीटरचे आव्हानात्मक (Up Run) अंतर त्यांनी ११ तास २८ मिनिटांत यशस्वीरित्या पूर्ण केले. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी १२ तासांची कडक वेळ मर्यादा असते.

बावीस हजार धावपटूंशी गाठ

नुकत्याच पार पडलेल्या या जागतिक कीर्तीच्या स्पर्धेत जगभरातून २२ हजारांपेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता. या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी भारतातून केवळ २८९ धावपटू पात्र ठरले होते. यात स्थान मिळवण्यासाठी आदल्या वर्षी कोणत्याही जागतिक मान्यताप्राप्त मॅरेथॉनमध्ये ५ तासांपेक्षा कमी वेळात अंतर पार करणे बंधनकारक होते. डॉ. गोपाळ शिंदे यांनी 'टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६' मध्ये ४ तास ३० मिनिटे आणि ६ सेकंद अशी उत्कृष्ट वेळ नोंदवून या जागतिक स्पर्धेचे तिकीट मिळवले होते.

पहाटेचा खडतर सराव अन् नियोजन

या आंतरराष्ट्रीय यशासाठी डॉ. शिंदे यांनी अत्यंत नियोजनबद्ध व कौशल्यपूर्ण तयारी केली होती. विद्यापीठाची १० किमी मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन आणि त्यानंतर ५०, ५६ व ६५ किमीच्या अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी स्वतःला सिद्ध केले. सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान दरमहा १५० ते २०० किमी, तर जानेवारी ते मे २०२६ या काळात दरमहा तब्बल ३०० किमी धावण्याचा सराव त्यांनी रोज पहाटे केला. धावण्यासोबतच दर आठवड्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग, सायकलिंग आणि पोहण्याचा सरावही त्यांनी सुरू ठेवला होता.

Advertisement

इच्छाशक्तीमुळेच यश शक्य!

"जागतिक स्तरावरील या स्पर्धेचा प्रवास अत्यंत खडतर होता. मात्र, दृढ इच्छाशक्ती आणि योग्य नियोजनामुळेच हे यश संपादन करता आले. या संपूर्ण प्रवासात मला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि 'MPGIMER' चे मोलाचे सहकार्य व पाठिंबा लाभला."

— प्रा. डॉ. गोपाळ शिंदे, विभागप्रमुख, अस्थिरोग विभाग

विद्यापीठ वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकचे आणि विद्यापीठाचे नाव उंचावल्याबद्दल डॉ. गोपाळ शिंदे यांचे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव सोनवणे, कुलसचिव राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधिकिरण सोनकांबळे आदींनी विशेष अभिनंदन करून कौतुक केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.