नाशिक, (प्रतिनिधी) २३ जून - नाशिक शहर पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या एका जागरूक नागरिकाच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत, अंबड पोलिसांनी औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मीनगर भागात धडक कारवाई केली. या कारवाईत मॅफेड्रॉन (एमडी) या घातक अमली पदार्थाची राजरोस विक्री करणाऱ्या एका सराईत पेडलरला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. संशयिताच्या ताब्यातून ८ ग्रॅम ड्रग्ज, रोकड आणि एक आयफोन असा एकूण १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या डिजिटल उपक्रमामुळे एका मोठ्या ड्रग्ज विक्रेत्याचा पर्दाफाश झाल्याने परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.
अंगझडतीत सापडल्या 'झिपलॉक' पिशव्या
विक्की संतोष वाकळे (वय २३, रा. हनुमान मंदिराजवळ, कामटवाडे, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित एमडी पेडलरचे नाव आहे. महालक्ष्मीनगर येथील सोनाली वाईन्स शॉप परिसरात एक तरुण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने या भागात पाळत ठेवून सापळा रचला.
संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या विक्की वाकळे याला पथकाने ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 'झिपलॉक' असलेल्या प्लास्टिकच्या छोट्या पिशव्यांमध्ये ८ ग्रॅम मॅफेड्रॉन (MD) ड्रग्ज आढळून आले. पोलिसांनी ड्रग्जसह गुन्ह्यात वापरला जाणारा महागडा आयफोन आणि ४ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.
डिजिटल तक्रारीवर पोलिसांची 'ऑन द स्पॉट' कारवाई
शहरातील अंमली पदार्थांच्या विळख्याविरुद्ध नाशिक पोलिसांनी सुरू केलेल्या व्हॉट्सॲप तक्रार निवारण मोहिमेला या कारवाईमुळे मोठे यश आले आहे. ग्रुपवर माहिती मिळताच पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता 'ऑन द स्पॉट' कारवाई करत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्याचे धागेदोरे आणखी कुठे पसरले आहेत आणि तो हे ड्रग्ज कुठून आणत होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक :
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, निरीक्षक अविनाश नडविनकेरी आणि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर, हवालदार योगेश देसले, सुभाष ठुबे, अंमलदार सागर जाधव, समाधान शिंदे, फरीद इनामदार, मयुर पवार, उल्हास गांगुर्डे, अनिल गाढवे, तुषार मते, वैभव एखंडे, सचिन करंजे आणि योगेश शिरसाठ आदींच्या पथकाने केली.