नाशिक पोलिसांचे मध्यरात्री 'ऑल आऊट कोंबिंग ऑपरेशन'... गुन्हेगारांची धरपकड, टवाळखोरांना दणका...

Share:
Main Image
Last updated: 23-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २३ जून - शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी रविवारी (दि. २१) रात्री पुन्हा एकदा धडक 'कोंबिंग ऑपरेशन' आणि 'ऑल आऊट' मोहीम हाती घेतली. अवघ्या पोलीस दलाने रस्त्यावर उतरत केलेल्या या जोरदार कारवाईमुळे गुन्हेगारांची चांगलीच पळता भुई थोडी झाली. परिमंडळ एक आणि दोनच्या हद्दीत राबवलेल्या या मोहिमेत अभिलेखावरील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासोबतच, उघड्यावर दारू पिणारे आणि टवाळखोरांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.

सातपूर, अंबड परिसरात अवैध धंद्यांवर छापा

सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहत परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टवाळखोरांवर तसेच उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आली होती. पोलीस उपआयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या सूचनेनुसार परिमंडळ दोनमधील गुन्हे शोध पथकातील ५ अधिकारी व ३३ अंमलदारांनी ही कारवाई केली. सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रबुद्ध नगर, अशोक नगर, श्रमिक नगर भागात कोंबिंग ऑपरेशन दरम्यान अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्या दोन जणांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये (प्रोव्ही ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय इंदिरानगर, नाशिकरोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प भागातही संशयितांची कसून तपासणी करण्यात आली.

गंगापूर हद्दीत ११ घरफोड्यांची तपासणी; ५५ टवाळखोरांवर कारवाई

Advertisement

दुसरीकडे, गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत परिमंडळ एकमधील गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकांच्या मदतीने मोठी नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाईत १३ अधिकारी आणि ५७ अंमलदार सहभागी झाले होते.

या मोहिमेदरम्यान पोलिसांनी गुन्हेगारी अभिलेखावरील ८ संशयित, घरफोडीच्या गुन्ह्यातील ११ आरोपी, दुचाकी चोरीतील ४ आरोपी आणि शस्त्र कायद्याशी संबंधित ५ आरोपींची प्रत्यक्ष तपासणी केली. तसेच संत कबीर नगर भागात दारूबंदी कायद्यांतर्गत एक कारवाई करण्यात आली. रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी उपद्रव माजवणाऱ्या तब्बल ५५ टवाळखोरांवर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई केली.

मुख्य चौकांत नाकाबंदी; 'ट्रिपल सीट' वाहनधारकांना दंड

गंगापूर हद्दीतील कॉलेज रोड चौकी, टायटन शोरूम समोर आणि बापू पूल अशा तीन संवेदनशील ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदीत संशयास्पद वाटणाऱ्या ५४ वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि हुल्लडबाजी करणाऱ्या १० 'ट्रिपल सीट' दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या अचानक झालेल्या 'ऑल आऊट' मोहीम आणि नाकाबंदीमुळे शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.