जमिनीच्या वादातून नांदूर शिंगोट्यात दोन गटात तुंबळ हाणामारी... लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्यांचा वापर...

Share:
Main Image
Last updated: 23-Jun-2026

सिन्नर, (प्रतिनिधी) २३ जून - सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील चकोर मळा भागात जमिनीच्या जुन्या वादातून आणि रस्त्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (दि. १८) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, यात दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली फिर्याद: दिव्यांग व्यक्तीला रॉडने मारहाण

याप्रकरणी पहिली फिर्याद भाऊसाहेब तुकाराम चकोर (वय ४९, रा. नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर) यांनी दिली आहे. त्यानुसार अंकुश बबन चकोर (३२), साईनाथ शिवकुमार वाघ (२२), बबन कारभारी चकोर (सर्व रा. नांदूर शिंगोटे) व अनिकेत भानुदास आव्हाड (रा. धुळवड, ता. सिन्नर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

भाऊसाहेब चकोर हे एका हाताने दिव्यांग असून संशयित त्यांचे नातेवाईकच आहेत. गुरुवारी रात्री भाऊसाहेब हे आपल्या बोलेरो पिकअप गाडीने चकोर वस्तीच्या दिशेने जात असताना संशयितांनी त्यांचे वाहन अडवले. ‘तू या रस्त्याने जायचे नाही, हा रस्ता आमचा आहे’ असे म्हणत अंकुश चकोर व साईनाथ वाघ यांनी त्यांना जीवे मारण्याची व गाडी फोडण्याची धमकी दिली. भाऊसाहेब यांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी त्यांना व त्यांच्यासोबत असलेल्या अन्य एकास लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. "एका हाताने खुळा आहेस, दुसराही हात काढून टाकू" अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Advertisement

दुसरी फिर्याद: कुऱ्हाड, लाठ्या-काठ्यांनी हल्ला

याच घटनेप्रकरणी दुसरी फिर्याद साईनाथ वाघ यांनी दिली आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर सदाशिव चकोर (४०), भाऊपाटील तुकाराम चकोर (४९) व कार्तिक भाऊपाटील चकोर (२२, रा. नांदूर शिंगोटे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या जमिनीच्या वाटे-हिश्शावरून झालेल्या वादातून संशयितांनी गुरुवारी रात्री साईनाथ वाघ व त्यांचा मामेभाऊ अंकुश चकोर यांना लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी साईनाथ यांचे मामा बबन चकोर व मामी अंजनाबाई चकोर या दोघांना वाचवण्यासाठी धावून आल्या असता, संशयित टोळक्याने त्यांनाही शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

घटनास्थळी वावी पोलिसांनी धाव घेतली असून परिसरात तणावाचे वातावरण होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोठावळे व पोलीस उपनिरीक्षक सरोवर करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.