नाशिकमध्ये गोवंश तस्करांना दणका... पोलीस आयुक्तांनी दिले हे कडक आदेश...

Share:
Main Image
Last updated: 23-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २३ जून - गोवंश जनावरांची बेकायदेशीर तस्करी, कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांवर नाशिक शहर पोलिसांनी हद्दपारीची (तडीपारी) मोठी कारवाई केली आहे. पाळीव प्राण्यांच्या जीवितास आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणे, तसेच या बेकायदेशीर कृत्यांना अटकाव करणाऱ्यांना मारहाण व जीवे मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशतीचे वातावरण पसरवल्याचा संशयितांवर आरोप आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील गुन्हेगारी आणि उपद्रवी प्रवृत्तींवर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ही कडक पावले उचलण्यात आली आहेत.

तडीपार करण्यात आलेले संशयित:

१. नवाज रशिद सय्यद उर्फ मन्ना (वय ५२, रा. बडी दर्गा समोर, बागवानपुरा) – नाशिकरोड पोलीस ठाणे रेकॉर्ड

२. जमील रशीद कुरेशी (वय ४०, रा. नाईकवाडीपुरा, जुने नाशिक) – उपनगर पोलीस ठाणे रेकॉर्ड

३. अंंजूम बिस्मिल्ला कुरेशी (रा. दत्त मंदिराजवळ, सात्विक नगर, पखालरोड, अशोका मार्ग) – एमआयडीसी पोलीस ठाणे रेकॉर्ड

Advertisement

पोलिसांच्या रेकॉर्डवरील गंभीर गुन्हे

अटक करण्यात आलेले संशयित हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणे, त्यांची कत्तल करणे आणि बंदी असलेल्या मांसाची विक्री करण्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने पोलिसांनी अखेर हद्दपारीचे अस्त्र उगारले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, उपायुक्त किशोर काळे यांनी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या गुन्हेगारी आलेखाचा सविस्तर आढावा घेतला. त्यानुसार संशयितांच्या वर्तनात सुधारणा व्हावी आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रतिबंधक कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि नाशिकरोड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांनी पाठवलेल्या तिघांच्या हद्दपारीच्या प्रस्तावांना कायदेशीर पडताळणीनंतर मंजुरी देण्यात आली आहे. या कारवाईमुळे गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.