नाशिकमध्ये 'चैनस्नॅचर्स'च्या टोळीचा पर्दाफाश... दोघे जेरबंद, सहा गुन्ह्यांचा उलगडा...

Share:
Main Image
Last updated: 23-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २३ जून - नाशिक शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून धुमाकूळ घालणाऱ्या दोन सराईत चैनस्नॅचर्सना बेड्या ठोकण्यात शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाला मोठे यश आले आहे. मिरची हॉटेल ते दसक मार्गावरील गोदावरी नदीच्या पुलावर सापळा रचून पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या अटकेमुळे उपनगर, इंदिरानगर, गंगापूर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ६ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. संशयितांच्या ताब्यातून एक 'आय-१०' कार, विनानंबरची मोपेड दुचाकी, महागडे मोबाईल आणि सोन्याची लगड असा एकूण १७ लाख ९५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गळाला

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१. अनिल उर्फ बाळा सखाराम डिग्रसकर (वय ३३, रा. संजय गांधीनगर झोपडपट्टी, जेलरोड; सध्या रा. सप्तशृंगीनगर, नारायण बापूनगर, नाशिक)

२. कन्हैय्या विजय पाटील (वय ३६, रा. सोहम सोसायटी, हरीकुलनगर, राजराजेश्वरी मंदिराजवळ, जेलरोड, नाशिक)

हे दोन्ही संशयित पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.

Advertisement

सलग ८ दिवस तांत्रिक तपास अन् 'मिरची' पुलावर सापळा

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी झालेल्या एका चैनस्नॅचिंगच्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे युनिट २ पथक करत होते. गुन्ह्याचे घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत पथकाने सलग आठ दिवस तांत्रिक माग काढला. या तपासादरम्यान उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, हवालदार सुनील आहेर व अतुल पाटील यांना संशयितांची खात्रीशीर नावे निष्पन्न करण्यात यश आले.

या दरम्यान, मुख्य संशयित अनिल उर्फ बाळा डिग्रसकर हा एका 'आय-१०' कारमधून येणाऱ्या आपल्या मित्राला भेटण्यासाठी मिरची हॉटेल ते दसक दरम्यानच्या गोदावरी नदीच्या पुलावर येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच युनिट २ च्या पथकाने तात्काळ पुलावर सापळा रचला आणि तिथे येताच दोघांना रंगेहात घेरून अटक केली.

शहरातील 'या' भागातील गुन्हे उघड

पोलीसी खाक्या दाखवताच संशयितांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांनी नाशिकमधील उपनगर, इंदिरानगर, गंगापूर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैनस्नॅचिंगचे ६ गुन्हे केल्याचे कबूल केले. चोरलेले सोने वितळवून त्यांनी त्याची लगड तयार केली होती, जी पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाईमुळे शहरातील महिलांवरील चोरीच्या घटनांना मोठा आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक :

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके व युनिटचे प्रभारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. समाधान हिरे, उपनिरीक्षक संजय सानप, यशवंत बेंडकोळी, बाळू शेळके, हवालदार सुनील आहेर, अतुल पाटील, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी व प्रवीण वानखेडे आदींच्या पथकाने केली.

Advertisement

Comments

No comments yet.