FDAचे तोतया अधिकारी बनून तोडपाणी करणारी टोळी जेरबंद... महिला साथीदारासह तिघांना २४ तासांत अटक...

Share:
Main Image
Last updated: 22-Jun-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २२ जून - अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी असल्याचे भासवून बनावट ओळखपत्राच्या जोरावर दुकानदारांना धमकावणाऱ्या आणि खंडणी उकळणाऱ्या एका भामट्यांच्या टोळीचा एमआयडीसी सिन्नर पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत पर्दाफाश केला आहे. स्वीटमार्ट शॉपच्या मालकाला अन्नपदार्थात भेसळ असल्याचे सांगून परवाना रद्द करण्याची भीती दाखवत खंडणी उकळणाऱ्या दोन पुरुषांसह एका महिला आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बनावट ओळखपत्र दाखवून उकळली रोख रक्कम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिझवान इब्राहिम खान यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. खान यांच्या दुकानात दोन अनोळखी पुरुष आणि एका महिलेने प्रवेश केला. आम्ही 'अन्न व औषध प्रशासन' विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी बनावट ओळखपत्र दाखवले. दुकानात अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याची भीती घालून कारवाई टाळण्यासाठी त्यांनी खान यांच्याकडून रोख रक्कम उकळली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर ८१/२०२६ नुसार बी.एन.एस. कलम ३०८(२), ३३६(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर तपासाची चक्रे फिरली

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ २) किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (अंबड विभाग) डॉ. सचिन बारी यांनी एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट-२ च्या डी.बी. पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

पंचवटीतून मुख्य सूत्रधाराला ठोकल्या बेड्या

Advertisement

एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखेचे अंमलदार संयुक्तपणे तपास करत असताना, हा गुन्हा रोशन गव्हाणे व त्याच्या साथीदारांनी केल्याची निष्पन्न झाले. रोशन गव्हाणे हा पंचवटीतील कारंजा भागात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव रोशन चांगदेव गव्हाणे (वय ३५, रा. महाकाली चौक, सिडको, नाशिक; सध्या रा. पंचवटी, कारंजा, नाशिक) असे सांगितले.

महिला साथीदारासह तिघेही अटकेत

रोशन गव्हाणे याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार विजय बागुल आणि एका महिलेच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवून विजय चुनिलाल बागुल (वय ४३, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिला साथीदाराला ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश मुगले करत आहेत.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

"अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून कोणी बनावट ओळखपत्र दाखवत असेल आणि कारवाईची भीती घालून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत असेल, तर नागरिकांनी तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन किंवा एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा," असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या पथकाने केली कामगिरी

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, किशोर काळे, एसीपी संदीप मिटके, डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण चव्हाण, गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी सपोनि हेमंत तोडकर, सपोनि गणेश मुगले, पोउपनि संदिप शेवाळे, श्रेणी पोउपनि मुक्तारखान पठाण, भारती देवकर, सपोउपनि गुलाब सोनार, शंकर काळे, पोहवा प्रदिप नन्नवरे, वाल्मिक चव्हाण, जाधव, पोअं महेश खांडबहाले, प्रविण वानखेडे, सहाणे आणि बिराजदार यांच्या पथकाने केली.

Advertisement

Comments

No comments yet.