अवघ्या १ हजार रुपयांसाठी केला मित्राचा खून... दोन दिवस मृतदेहाशेजारी पहारा... पोलिसांनी असा लावला छडा...

Share:
Main Image
Last updated: 22-Jun-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) २२ जून - सातपूर येथील कामगार नगर भागात एका इमारतीच्या टेरेसवर आढळून आलेल्या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात सातपूर पोलिसांना अवघ्या १२ तासांच्या आत यश आले आहे. पैशांच्या वादातून मित्रानेच धारदार चाकूने वार करून ही हत्या केल्याचे समोर आले असून, मुंबईला पळून जाण्याच्या बेतात असलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून शिताफीने ताब्यात घेतले. वैष्णव मिलिंद शिंदे (वय २४, रा. कामगार नगर, सातपूर) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

२४ वर्षीय तरुण दोन दिवसांपासून होता बेपत्ता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णव शिंदे हा २० जून २०२६ रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलीस त्याचा शोध घेत असतानाच, २१ जून रोजी कामगार नगर भागातील एका इमारतीच्या टेरेसवर कुजलेल्या अवस्थेत एक अनोळखी मृतदेह आढळून आला. घटनेचे गांभीर्य ओळखून सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिर यांनी तातडीने नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ २) किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (अंबड विभाग) सचिन बारी यांना अवगत केले.

अशी रचली तपासाची चक्रे

वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन खैरनार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची ओळख पटवली. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट-२ चे सपोनि हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके रवाना करण्यात आली.

मुंबईला पळण्याच्या बेतात असतानाच पोलिसांची झडप

Advertisement

गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी मानवी तपास कौशल्य, स्थानिक बातमीदार आणि तांत्रिक कौशल्याचा कौतुकास्पद वापर केला. संशयित आरोपी कृष्णा राकेश दुसाने (वय १९, रा. कामगार नगर, सातपूर) हा नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरातून मुंबईच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्टेशनवर सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले आणि १२ तासांच्या आत या अंधाऱ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला.

केवळ १,००० रुपयांसाठी घेतला जीव; दोन दिवस मृतदेहाशेजारी पहारा

पोलिसी खाक्या दाखवताच संशयित आरोपी कृष्णा दुसाने याने गुन्ह्याची कबुली दिली. मृत वैष्णव शिंदे याने कृष्णाला १,००० रुपये उसनवारीने दिले होते. वैष्णव आपल्या पैशांची मागणी करत कृष्णाला शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी देत होता. याच रागातून १९ जूनच्या मध्यरात्री कृष्णाने वैष्णवच्या छातीवर आणि गळ्यावर धारदार चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केली.

घटना घडल्यानंतर अतिशय थंड डोक्याने पुरावा नष्ट करण्यासाठी कृष्णाने मृतदेह एका पोत्यात भरला. दोन दिवस तो मृतदेहावर लक्ष ठेवून होता आणि त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत होता; मात्र त्याला यश आले नाही. अखेर मृतदेहाचा तीव्र दुर्गंध सुटल्याने हा सर्व प्रकार स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या निदर्शनास आला.

या पथकाने केली कामगिरी

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, एसीपी सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिर, पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील सपोउपनि अनिल पोहवा, दीपक खरपडे, तुषार देसले, सचिन साबळे, किशोर बेंडकुळे, सोनु खाडे, सागर कोळी, सचिन आजबे, अमोल मोरे, संजय पोअं, पारस देशमुख, योगेश्वर गायकवाड, रविंद्र पोअं, रोहीदास कनोजे, सानिल शिरसाठ आणि गोकुळ वाबळे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिर करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.