नाशिक/येवला/लासलगाव, (प्रतिनिधी) २२ जून - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पातून लासलगाव–पाटोदा–नगरसुल राज्य महामार्गच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल ३४० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली असून या रस्त्याची रुंदी १० मीटर असणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे येवला मतदारसंघातील ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम होणार असून शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ केंद्र म्हणून ओळखली जाते. लासलगाव–पाटोदा–नगरसुल हा मार्ग कृषी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात कांदा, भाजीपाला, धान्य तसेच इतर कृषी मालाची वाहतूक केली जाते. या रस्त्यावरील दळणवळण लक्षात घेऊन या मार्गाचे काँक्रिटीकरण व्हावे यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जलद आणि सुरक्षितपणे पोहोचविता येणार आहे. वाहतूक खर्चात बचत होणार असून मालाच्या वाहतुकीस लागणारा वेळही कमी होणार आहे. तसेच या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील उद्योग, व्यापार आणि आर्थिक व्यवहारांना चालना मिळणार आहे.
यापूर्वीही मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून पिंपळस ते येवला या महत्त्वाच्या चौपदरी काँक्रीटीकरण मार्गासाठी ५६० कोटी रुपये तसेच लासलगाव–विंचूर चौपदरी काँक्रीटीकरण रस्त्यासाठी १३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या रस्त्यांची कामे वेगाने सुरु आहे. आता लासलगाव–पाटोदा–नगरसुल मार्गालाही काँक्रीटीकरण करण्यासाठी ३४० कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने येवला-लासलगाव परिसरातील रस्ते विकासाच्या कामांना आणखी बळ मिळाले आहे.
या सर्व प्रकल्पांमुळे येवला मतदारसंघ आणि परिसरातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला जाणार असून दळणवळण व्यवस्था अधिक आधुनिक आणि सक्षम होणार आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ही विकासकामे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
प्रतिक्रिया
"मंत्री छगन भुजबळ यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे आणखी एक महत्त्वाचा रस्ता मंजूर झाला आहे. लासलगाव–पाटोदा–नगरसुल मार्ग हा केवळ वाहतुकीचा रस्ता नसून तो हजारो शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी जोडलेला जीवनमार्ग आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीला मोठी चालना मिळेल, बाजारपेठांशी संपर्क वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल. पिंपळस–येवला, लासलगाव–विंचूर आणि आता लासलगाव–पाटोदा–नगरसुल अशा सलग मंजुरी मिळालेल्या रस्ते प्रकल्पांमुळे संपूर्ण परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. विकासकामांच्या माध्यमातून जनतेला दिलेला शब्द मंत्री छगन भुजबळ सातत्याने पूर्ण करत आहेत.
माजी खासदार समीर भुजबळ