बँक वसुली कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला... ट्रॅक्टर जप्त करतेवेळी मारला डोक्यात दांडका...

Share:
Main Image
Last updated: 22-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ जून - बँकेचे कर्ज थकल्यामुळे ट्रॅक्टर जप्त करण्यासाठी गेलेल्या 'येस बँके'च्या दोन वसुली कर्मचाऱ्यांना कर्जदाराने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव येथे घडली आहे. या हल्ल्यात बँकेचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरामण शिवाजी झडे (रा. कांचनगाव, ता. इगतपुरी) असे बँकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या संशयित कर्जदाराचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

बँकेचे वसुली कर्मचारी गौरव शांताराम गोवर्धने (रा. जुने नाशिक) यांनी याप्रकरणी घोटी पोलिसांत फिर्याद दिली आहे. गौरव गोवर्धने हे 'येस बँके'चे वसुली कर्मचारी (रिकव्हरी एजंट) म्हणून काम करतात. शुक्रवारी (दि. १९) दुपारी ते त्यांचे सहकारी कर्मचारी चेतन रमेश अग्रवाल यांना सोबत घेऊन कांचनगाव येथे कर्ज वसुलीसाठी गेले होते.

Advertisement

दोघे कर्मचारी कर्जदार हिरामण झडे याला भेटले आणि त्यांनी बँकेच्या थकीत हप्त्यांबाबत विचारपूस केली. कर्जदाराकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने नियमानुसार त्यांनी थकबाकी वसुलीसाठी संशयिताच्या (MH-15 JX-1407) क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई सुरू केली.

ट्रॅक्टरवरून खाली खेचले अन् दांडक्याने प्रहार केला!

कर्मचारी गौरव गोवर्धने हे जप्तीची कारवाई करत ट्रॅक्टर सुरू करत असतानाच संशयित हिरामण झडे संतप्त झाला. "माझा ट्रॅक्टर कुठे घेऊन जाता?" असे ओरडत त्याने गोवर्धने यांना चालत्या ट्रॅक्टरवरून बळजबरीने खाली खेचले आणि त्यांच्यावर लाकडी दांडक्याने थेट हल्ला चढवला. संशयिताने गोवर्धने यांच्या डोक्यात दांडका मारल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि गंभीर जखमी झाले.

यावेळी गोवर्धने यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेले त्यांचे सहकारी चेतन अग्रवाल यांनाही संशयिताने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत आणि झटापटीत कर्मचाऱ्याचा मोबाईल फोन खाली पडून फुटला असून त्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घोटी पोलीस ठाण्याचे हवालदार इंगळे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.