येवला, (प्रतिनिधी) २२ जून - तालुक्यातील पारेगाव येथे अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या निवासी नायब तहसीलदार व ग्राम महसूल अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ येवला तालुका तलाठी संघ, महसूल कर्मचारी संघटना आणि महसूल सेवक संघटनेच्या वतीने सोमवारी एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
पारेगाव परिसरातील तळ्यालगत कथित अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाचे पथक कारवाईसाठी गेले होते. यावेळी निवासी नायब तहसीलदार व ग्राम महसूल अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर येवला शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. येवला तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष दत्तात्रय गिरी, उपाध्यक्ष सविता घिवर सचिव श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर आर. एस. देशमुख, व्ही. पी. भड, समर्थ कांदळकर, बाळासाहेब हावळे, शुभम अलवट, परेश रायजादे, मनीषा इगवे, अनिल बावस्कर, यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, अवैध वाळू, मुरूम व गौण खनिज उत्खननाविरोधात कारवाई करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांवर वारंवार दबाव टाकला जात आहे. अशा घटनांमुळे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे संबंधित आरोपींना तातडीने अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच महसूल कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे. हल्लेखोरांविरुद्ध ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
या घटनेमुळे येवला तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.